शहराबाहेरील मृतदेह आणल्याने स्मशानभूमीला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:58 PM2020-08-13T23:58:28+5:302020-08-13T23:58:37+5:30
सारसोळे ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार
- अनंत पाटील
नवी मुंबई : महापालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांचा पूर्वीपासून विरोध आहे. असे असतानाही खालापूर येथून एका मृतदेह सारसोळे येथील महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आणल्यामुळे संतप्त झालेल्या सारसोळे ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी थेट या स्मशानभूमीलाच टाळे ठोकले. मात्र काही वेळाने मृतदेह माघारी पाठविण्यात आल्याने ग्रामस्थांनी स्मशानभूमीचे टाळे उघडले. या प्रकरणी ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा नेरूळ येथील तेरणा रुग्णालयात गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह खालापूरला न नेता तो सारसोळे गावच्या स्मशानभूमीत आणला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविला. तसेच कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी मृतदेह जाळण्याच्या प्रकाराबाबत जोरदार आक्षेप घेत या स्मशानभूमीला टाळे ठोकले.
महापालिका व खासगी रुग्णालयाकडून कोरोनाग्रस्त मृतदेहांना नेरूळ सेक्टर ४ मधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाठविले जाते. यासंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीसुद्धा आक्षेप नोंदविला होता. गुरुवारी असाच प्रकार घडल्याने अखेर संतप्त युवकांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकले. परंतु काही ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मध्यस्थीने स्मशानभूमीचे टाळे काढण्यात आले. तथापि यापुढे बाहेरील कोणत्याही भागातील कोरोनाग्रस्त मृतदेह सारसोळे स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी आणला तर तो मृतदेह महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या टेबलावर नेवून ठेवला जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने मनोज यशवंत मेहेर यांनी दिला आहे.
बुधवारी मध्यरात्री मुंबई येथील एका कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहावर अंत्यविधी न करता सारसोळेच्या ग्रामस्थांनी परत पाठवून दिला होता. गुरुवारी सकाळी अंत्यविधीसाठी खालापूर येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सारसोळे स्मशानभूमीत आणला जाणार असल्याचे समजताच सारसोळेच्या युवकांच्या संतापाचा उद्रेक झाला. मनोज मेहेर, नीलेश तांडेल, विशाल मेहेर, प्रतीक तांडेल, गणेश यांच्यासह अन्य युवकांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली व थेट सारसोळे स्मशानभूमीलाच टाळे ठोकत फोटो महापालिका अधिकाऱ्यांना पाठवून दिले. नवी मुंबईत सर्वत्र स्मशानभूमी असताना सारसोळेच्याच स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त अंत्यविधीसाठी पालिका व हॉस्पिटलकडून का पाठवितात, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
सारसोळे गावातील स्मशानभूमीत कोरोनाचा खालापूर येथील मृतदेह आणल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टाळे ठोकल्याचा प्रकार खरा आहे. पण ग्रामस्थांनी आता टाळे उघडून स्मशानभूमीचे प्रवेशद्वार खुले केले आहे. गुरुवारी या स्मशानभूमीत एकूण सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
- दत्तात्रय नागरे, प्रभारी सहायक आयुक्त, नेरूळ विभाग