ब्रिटनची शॉन कॉक्सी ठरली विश्वविजेती
By admin | Published: June 30, 2017 03:02 AM2017-06-30T03:02:14+5:302017-06-30T03:02:14+5:30
वाशी येथे नुकताच पार पडलेल्या आयएफएससी विश्वचषक क्लाइंबिंग स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या शॉना कॉक्सी हिने आपले वर्चस्व राखताना महिला गटात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाशी येथे नुकताच पार पडलेल्या आयएफएससी विश्वचषक क्लाइंबिंग स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या शॉना कॉक्सी हिने आपले वर्चस्व राखताना महिला गटात विजेतेपदावर नाव कोरले. त्याचवेळी, पुरुष गटात कोरियाच्या जाँगवॉन चॉन याने जेतेपदाला गवसणी घातली. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत जगभरातील अव्वल क्लाइंबर्सनी आपले कौशल्य दाखवले.
आंतरराष्ट्रीय क्लाइंबिंग क्रीडा संघटनेच्या (आयएफएससी) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत यजमान भारताच्या खेळाडूंनीही चमक दाखवली; परंतु मोक्याच्या वेळी प्रयत्न कमी पडल्याने त्यांना काही गुणांचा फटका बसला. संपूर्ण स्पर्धेत भारताला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. ब्रिटनच्या कोक्सीने पहिल्या फेरीपासून वर्चस्व राखत मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत सहजपणे जेतेपदाला गवसणी घातली. कोक्सीला ११ प्रयत्नांमध्ये चार टॉप (४टी ११) साध्य करायचे होते. तसेच, ४ बोनस गुण मिळवण्यासाठी तीला ८ प्रयत्नांत दिलेले लक्ष्य साध्य करायचे होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारी कोक्सी ब्रिटनची पहिली खेळाडू ठरली. त्याचवेळी मिहो नोनाका आणि अकियो नोगुची या जपानच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. दुसरीकडे, पुरुष गटात कोरियाच्या चॉनने देखील सहजपणे बाजी मारताना प्रतिस्पर्धी खेळाडूंना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याने प्रत्येक प्रकारात अव्वल स्थान पटकावताना आपले विश्वविजेतेपद निश्चित केले.