कोपर खैरणेतून दोन बांग्लादेशींसह दलाल अटक; १०९ बनावट पॅनकार्डसह ११ आधारकार्ड हस्तगत
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 3, 2023 11:09 AM2023-04-03T11:09:17+5:302023-04-03T11:09:31+5:30
कोपर खैरणे सेक्टर १ परिसरात काही बांग्लादेशी व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी कोपर खैरणेतून दोन बांग्लादेशींसह एका दलालाला अटक केली आहे. या दलालाकडून १०९ बनावट पॅनकार्डसह ११ आधारकार्ड व काही नगरसेवकांचे बनावट स्टॅम्प आढळून आले आहेत.
कोपर खैरणे सेक्टर १ परिसरात काही बांग्लादेशी व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांनी पथक केले होते. या पथकाने शनिवारी दुपारी सापळा रचून दुल्लू प्रधान व फिरदोस शिकदार यांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांच्याकडील बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड आढळून आले. त्याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दलाल गंगाप्रसाद तिवारी याने त्यांना ही कागदपत्रे बनवून दिली असल्याचे सांगितले.
पथकाने तिवारी याच्या कार्यालयावर धडक दिली असता त्याच्याकडे १०९ बनावट पॅनकार्ड व ११ बनावट आधारकार्ड आढळून आले. त्याशिवाय रहिवाशी दाखला देण्यासाठी वापरण्याकिरता काही नगरसेवकांच्या नावाचे बनावट स्टॅम्प देखील आढळून आले. त्यानुसार या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी याने बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात बांग्लादेशींना परिसरात आश्रयाचा मार्ग मोकळा करून दिल्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.