अलिबाग : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका हा बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड सेवेला बसला आहे. त्यामुळे अलिबाग, मुरुड आणि म्हसळा सर्कलमधील विविध बँका, पतसंस्था, कंपन्या, व्यापारी, दुकानदार यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार पुरते कोलमडून पडत आहेत. इंटरनेट सेवा विनाखंडित सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथे काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना बीएसएनएलच्या मुख्य केबलला हानी पोचली होती. त्याचा परिणाम अलिबागसह मुरुड, म्हसळा सर्कलमधील इंटरनेट सेवेवर झाला. त्यामध्ये प्रामुख्याने बीएसएनएलची ब्रॉड बॅण्ड सेवा, एसटीडी सेवा आणि मोबाइल सेवेचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरापासून वारंवार सेवा खंडित होत असल्याने जिल्ह्यातील बहुतांश बँका, पतसंस्था, कंपन्या, दुकाने, सायबर कॅफे, वृत्तपत्र कार्यालये, शेअर मार्केटिंगचे व्यवहार करणारे दलाल, तसेच विविध सरकारी कार्यालयामधील दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत. सातत्याने सेवा बंद पडत असल्याने जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार कोलमडून पडत असल्याने सर्वांचाच मनस्ताप वाढला आहे. त्यामधून पोस्ट कार्यालयालेही सुटलेली नाहीत. तेथे होणाऱ्या आर्थिक व्यवहारावरही काही अंशी अंकुश लागला आहे.सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला असताना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गटांगळ््या खात आहे. सरकारने कॅशलेस व्यवहारावर भर देण्याची सूचना नागरिकांना केली आहे. मात्र वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने कॅशलेस व्यवहारावर कमालीचे निर्बंध आले आहेत. खराब इंटरनेट सेवेचा फटका विविध बँकांच्या एटीएम सेवेला बसल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. पर्याय म्हणून बँकांमध्ये पैसे काढण्याचे फार्म भरून पैसे काढावे लागत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात आहे. त्याचा सर्वाधिक त्रास महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना होत आहे.दरम्यान, केबल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. सेवा विनाखंडित लवकरच सुरू करण्यात येईल असा विश्वास बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)रस्त्याच्या कामाचा फटकामुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका बीएसएनएलच्या सेवेला बसला आहे.पेण तालुक्यातील वडखळ येथे काही दिवसांपूर्वी काम सुरू असताना बीएसएनएलच्या मुख्य केबलला हानी पोचली होती. त्याचा परिणाम अलिबाग, मुरुड, म्हसळा सर्कलमधील इंटरनेट सेवेवर झाला. गेल्या महिन्याभरापासून वारंवार सेवा खंडित होत असल्याने दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत आहेत.
बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित
By admin | Published: April 10, 2017 6:07 AM