कमलाकर कांबळे, नवी मुंबई तीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या सिडकोच्या बीएमटीसी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना व्यवसायासाठी दुकानांच्या गाळ्याऐवजी आता मोकळे भूखंड देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना योजना विभागाला देण्यात आल्याचे समजते. जवळपास १६00 माजी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.बीएमटीसी कामगारांच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कामगार संघटनांच्या वतीने आंदोलने, मोर्चे काढण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर या कामगारांना व्यवसायासाठी दुकानांचे गाळे देण्याबाबतचा ठराव सिडकोने मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बीएमटीसी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना व्यवसायासाठी १00 चौरस फूट क्षेत्रफळाचे व्यावसायिक गाळे देण्याच्या मागणीवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर यासंदर्भातील शासकीय अध्यादेशही काढण्यात आला होता. त्यानुसार नवी मुंबई, पनवेल, उरण या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार गाळे बांधूत त्याचे वाटप करण्याचे धोरण सिडकोने आखले होते. मात्र विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. असे असले तरी आता व्यावसायिक गाळ्याऐवजी तितक्याच आकाराचे भूखंड देण्याचे सिडकोने ठरविले आहे. त्यानुसार चाचपणी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आल्याचे समजते.
बीएमटीसी कर्मचाऱ्यांना मिळणार मोकळे भूखंड
By admin | Published: November 16, 2015 2:21 AM