फुगे उद्योग गुजरातमध्ये
By admin | Published: November 16, 2015 02:10 AM2015-11-16T02:10:06+5:302015-11-16T02:10:06+5:30
वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपायोगात आणून त्या आधारे अत्याधुनिक मशीनद्वारे उत्पादन घेण्याचा मनसुबा
शौकत शेख, डहाणू
वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपायोगात आणून त्या आधारे अत्याधुनिक मशीनद्वारे उत्पादन घेण्याचा मनसुबा असलेल्या डहाणूतील फुगे कारखानदारांना डहाणूच्या उद्योगबंदीचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील असंख्य फुगे उद्योग निर्मितीचे कारखाने गुजरातमधील उमरगाव येथे स्थलांतरित होत आहेत. परिणामी, या परिसरातील हजारो कुशल-अकुशल आदिवासी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
चायनाच्या मनमोहक, दर्जेदार, टिकाऊ तसेच स्वस्त फुग्यांनी पाच, सहा वर्षांपासून भारतीय बाजारपेठ काबीज केल्याने डहाणूतील फुग्यांना दिवसेंदिवस मागणी कमी होऊ लागली. त्यामुळे येथील असंख्य फुगे कारखाने आर्थिक संकटात सापडले असून वर्षभरात सुमारे दहा कारखाने बंद पडल्याने हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे डहाणूतील फुगे कारखानाधारक पारंपरिक पद्धतीने फुग्यांचे उत्पादन करीत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते तसेच खर्चाचे प्रमाणही वाढते. तर, चीनमधील उद्योजक अत्याधुनिक अॅटोमेटीक मशीनद्वारे फुग्यांचे उत्पादन घेत असल्याने त्यांना फुगे स्वस्तात पडतात. कमी वेळात तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन करणाऱ्या या मशीनची किंमत दोन कोटींच्या वर आहे. सध्या असे अत्याधुनिक स्वरूपाचे मशीन मेरठ तसेच भिवंडीत कार्यरत असल्याने येथील बहुसंख्य फुगे कारखानादारांनी हे मशीन खरेदी केले. परंतु, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक असलेल्या डहाणू तालुक्यात केंद्र शासनाने सन १९९१ मध्ये एक अधिसूचना जारी करून डहाणू तालुक्याला ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात औद्योगिक कारखान्यांना पूर्णपणे बंदी आहे. अगदी पिठाची चक्की चालू करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या जाचक अटींची पूर्तता करावी लागते. यात कारखान्यांसाठी परवानगीची बाब तर खूपच अडचणीची आहे. त्यामुळे डहाणूतील सहा ते आठ फुगे कारखानदारांनी गुजरातच्या उमरगाव येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केलेली असून तिथे वीज, पाण्याची सोय झाल्यानंतर येथील फुगे कारखाने तिथे स्थलांतरित होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेक इन महाराष्ट्र नारा देत राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी परदेश दौरे करत तिथल्या उद्योजकांसाठी पायघड्या घालत असताना मोठ्या प्रकल्पांच्या नादात राज्यातील मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांची आर्थिक घडी विस्कटली जात आहे. हे उद्योग सरकारदरबारी दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे डहाणूसारख्या ग्रामीण भागातील जवळजवळ सातआठ हजार कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची परिस्थिती उद्भवली आहे.
दरम्यान, डहाणूतील चाळीस ते पन्नास फुगे कारखानाधारक नवीन तंत्रज्ञानाने विकसित झाालेल्या अत्याधुनिक मशीन डहाणूत बसविण्यासाठी मुंबई तसेच दिल्ली येथे हेलपाटे घालत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणूसारख्या आदिवासी भागात फुगे उत्पादन करणारे मोठे उद्योग गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असून त्यामुळे येथील हजारो आदिवासींना रोजगार मिळतो. हे उद्योग येथे टिकवायचे असतील तर डहाणूच्या उद्योगबंदीवर शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.