सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:29 PM2021-02-26T23:29:27+5:302021-02-26T23:29:57+5:30
नवी मुंबई : पेट्रोल - डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...
नवी मुंबई : पेट्रोल - डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना गुरुवार, २५ फेब्रुवारीपासून विना अनुदानित एका सिलिंडरसाठी ७९४ रुपये मोजावे लागणार असल्याने गृहिणींमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
नवी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता ७६९ रुपयांवरून ७९४ रुपयांवर पोहोचली आहे. डिसेंबर २०२० मध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. राष्ट्रीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांनी दोनदा प्रत्येकी ५० रुपयांची वाढ केली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसला आहे.
नवी मुंबईत बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपखैरणे, घणसोली आणि ऐरोली परिसरात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या १५ ते २० एजन्सीज् आहेत. अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महानगर गॅस कंपनीमार्फत पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसपुरवठा केला जात असल्यामुळे सिलिंडरची संख्या कमी झाल्याची या दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणाऱ्यांना बसत आहे. तसेच अनुदानित गॅस सिलिंडरधारकांना मिळणारी सबसिडीसुद्धा कमी मिळत असल्याचे चित्र आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणारे लग्नसराईचे दिवस पाहता दरवाढ अधिक चिंताजनक ठरणार आहे, असे घणसोली येथील गृहिणी चांदणी म्हात्रे यांनी सांगितले.