अर्थसंकल्पात तब्बल १९७ कोटींची वाढ, शिवसेना, भाजपासह काँग्रेसचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:59 AM2018-03-14T02:59:26+5:302018-03-14T02:59:26+5:30
आयुक्तांनी ३१५० कोटी ९३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. चार दिवसांच्या चर्चेनंतर त्यामध्ये तब्बल १९७ कोटी रुपयांची वाढ करून ३३४८ कोटी ९३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे.
नवी मुंबई : आयुक्तांनी ३१५० कोटी ९३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. चार दिवसांच्या चर्चेनंतर त्यामध्ये तब्बल १९७ कोटी रुपयांची वाढ करून ३३४८ कोटी ९३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. साडेतीन तास उशिरा सुरू झालेल्या सभेत सत्ताधारी सदस्यांनी सुरू केलेल्या मनमानीचा निषेध करून शिवसेना, भाजपा व काँगे्रसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
आयुक्त रामास्वामी एन. यांनी २० फेब्रुवारीला स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प सादर केला. पालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच ३ हजार कोटी रूपयांचा टप्पा पार केला होता. यामुळे स्थायी समितीमध्ये त्यामध्ये किती वाढ केली जाणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. सर्व सदस्यांना अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ दिल्यानंतर चार दिवस अर्थसंकल्पावर चर्चेचे आयोजन केले होते. मंगळवारी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी दोन वाजता सभेचे आयोजन केले. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये व नंतर महापौरांसह माजी महापौर सागर नाईक यांच्याशी सुरू झालेली चर्चा लांबत गेली व सभा साडेतीन तास उशिराने सुरू झाले. पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पालिकेचे दैनंदिन कामकाजाची वेळ संपल्यानंतर सभा सुरू केल्यामुळे शिवसेनेच्या नामदेव भगत यांनी आक्षेप नोंदविला. एवढ्या उशिरा सभेचे कामकाज घेणे नियमबाह्य असल्याचे नमूद केले. परंतु त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. राष्ट्रवादीचे सदस्य अशोक गुरखे यांनी वाढ सुचविण्यास सुरवात केली. परंतु वाढ करण्यात आलेली कामे कोणती याची यादी शिवसेनेच्या सदस्यांनी मागितल्यानंतर ती दिली नाही. यामुळे विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदविण्यास सुरवात केली. सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. सत्ताधाºयांनी विरोधकांचे ऐकले नसल्याने शिवसेना, काँगे्रस व भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर राष्ट्रवादीने सभेचे कामकाज सुरू करून अर्थसंकल्पास मंजुरी दिली. तब्बल १९७ कोटी रूपयांची वाढ सुचविली आहे. जल विद्युत प्रकल्पाची उभारणी व सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ४० कोटी रूपये अनुदान मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मालमत्ता कर विभागाला ५७५ कोटींवरून १२५ कोटी रूपयांचे उद्दिष्ट वाढवून ७०० कोटी रूपये करण्यात आले आहे. नगर रचना विभागाचे उद्दिष्टही २५ कोटी रूपयांनी वाढविले आहे. जल विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी मूळ अर्थसंकल्पात १० लाखांची तरतूद केली होती. स्थायी समितीमध्ये त्यासाठी ९० कोटी रूपयांची वाढ सुचविली आहे. ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी १५ कोटी रूपयांची तरतूद होती त्यामध्ये वाढ करून २० कोटी करण्यात आले आहे. धरण विकत घेण्याच्या प्रकल्प टप्पा १ व २ अतिरिक्त पाणी उपलब्ध करून घेणे, भिवारी टाटा पॉवरहाऊसचे पाणी मोरबे जलप्रकल्पापर्यंत पोहचविण्यासाठी १० कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
पहिल्यांदा साडेपाच वाजता सभा
महापालिकेची सभा दोन वाजता आयोजित केली होती. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सदस्यांच्या प्री मिटिंग न संपल्यामुळे सभेला विलंब झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सूचनांप्रमाणे अर्थसंकल्पात कोणती कामे घ्यायची याची यादी सुरू होती. सभापतींच्या दालनानंतर महापौर जयवंत सुतार यांच्या दालनातही मिटिंग घेण्यात आली. त्यावेळी माजी महापौर सागर नाईकही उपस्थित होते.
विरोधकांची
तीव्र नाराजी
अर्थसंकल्पामध्ये वाढ सुचविताना राष्ट्रवादीने विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेतले नाही. सभा पूर्वसूचना न देता उशिरा सुरू केली. या मनमानीचा द्वारकानाथ भोईर यांनी तीव्र निषेध केला. नामदेव भगत यांनीही सभेचे कामकाज नियमबाह्य असल्याचा आरोप केला. सत्ताधाºयांनी मनमानी सुरूच ठेवल्याने शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
>आरोग्य सुविधा बळकट करा
स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी एक वर्षापासून आरोग्य विभागाच्या कामकाजावर अधिक लक्ष दिले आहे. रूग्णालयांचा दौरा करून व स्थायी समितीमध्ये चर्चा घडवून आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर दिला होता. अर्थसंकल्पामध्येही अतिरिक्त आयसीयू व एनआयसीयू युनिटसह इतर सर्व अत्याधुनिक सुविधांसाठी भरीव तरतूद केली आहे.
स्थायी समितीने सुचविलेली व खर्चात वाढ केलेली कामे (कोटी)
लेखाशीर्ष खर्च
एकत्रित पाणी निचरा सुधारणा ४०
एमआयडीसीतील रस्ते, पदपथ १०
उड्डाणपूल बांधणे २५
गावठाणातील विकासकामे २५
एफएसीसीआय कार्यान्वित करणे ४
कंत्राटी कामगार थकबाकी देणे ३५
सिडकोनिर्मित वसाहत सुधारणे १०
टाटा पॉवरचे पाणी मोरबेपर्यंत आणणे १०
जलविद्युत व सोलार प्रकल्प ९०.१०
लोककला केंद्र बांधणे २०
नवीन पूल बांधणे २०
स्मशानभूमी बांधणे व धुरांडे बांधणे ७.६८
व्यायामशाळा, समाजमंदिर, वाचनालय ३७.११
डेब्रिज प्रक्रिया,खत,वीजनिर्मिती ३२.३५
विद्युत तारा भूमिगत करणे ११.५६
परिवहन उपक्रम १००
पादचारी पूल १५.४
स्थायी समितीची सभा सूचना न देता उशिरा सुरू केली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने मनमानीपणे विकासकामांची वाढीव यादी सादर करण्यास सुरवात केली. नियमबाह्यपणे काम सुरू केल्यामुळे आम्ही निषेध करून सभात्याग केला.
- नामदेव भगत,
शिवसेना नगरसेवक
अर्थसंकल्पामध्ये १९७ कोटींची वाढ केली आहे. तीन महिन्यापूर्वी सर्व १११ नगरसेवकांना पत्र पाठवून त्यांना त्यांच्या प्रभागातील कामे सादर करण्यास सुचविले होते. स्थायी समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश केला आहे.
- शुभांगी पाटील,
सभापती, स्थायी समिती
>अर्थसंकल्पातील वाढ (आकडे कोटीत)
लेखाशीर्ष आयुक्त अंदाज वाढ एकूण
सोलार प्रकल्प अनुदान ० ४० ४०
अनधिकृत बांधकामे दंड ४.५० २ ६.५०
मालमत्ता कर ५७५ १२५ ७००
नगररचना १५० २५ १७५
हॉटेल परवारा १ ४ ५
इमारत भाडे ०.६ १ १.६