भूल देऊन म्हशींच्या तस्करीचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:27 AM2019-11-12T00:27:44+5:302019-11-12T00:27:47+5:30
खारघर शहरात नजीकच्या काळात गुंगीचे इंजेक्शन देऊन गायी, म्हशींच्या तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
पनवेल : खारघर शहरात नजीकच्या काळात गुंगीचे इंजेक्शन देऊन गायी, म्हशींच्या तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रविवारी सायंकाळीदेखील असाच प्रकार सेक्टर २१ जवळील श्री रविशंकर शाळेसमोर घडला. दोन म्हशींना गुंगीचे औषध दिल्याने या म्हशी या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे या म्हशींची तस्करी करण्याचा डाव येथील रहिवाशाच्या सतर्कतेमुळे फसल्याचे पाहावयास मिळाले.
रविवारी रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी हा प्रकार घडला. यावेळी या परिसरातील कुत्रे मोठ्या प्रमाणात भुंकत असल्याचे येथील रहिवाशांच्या लक्षात आले. यावेळी या ठिकाणी असलेल्या एका लॅबच्या मालकाला त्या परिसरात दोन म्हशी बेशुद्ध अवस्थेत पडल्याच्या दिसून आल्या, तसेच दुचाकीवर दोन तरुण या ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे लक्षात आले. येथील रहिवाशांनी पोलीस, तसेच प्राणिमित्रांना घटनास्थळी बोलावले.
पोलिसांनीदेखील घटनास्थळी पाहणी करीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना म्हशींची तपासणी करण्यासाठी बोलवले. या परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव जमल्याचे पाहावयास मिळाले. रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी सुरू होती. काही वेळात म्हशींच्या मालकांना घटनास्थळी बोलावण्यात आले. म्हशी शुद्धीवर आल्याने त्यांना मुर्बी येथील तबेल्यात हलविण्यात आले. संबंधित घटने संदर्भात कोणताही गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही.
खारघर शहरात असे प्रकार वाढत चालले असून मोठ्या प्रमाणात गायी म्हशींची तस्करी खारघर शहरात सुरू असल्याचा आरोप प्राणिमित्र शैलेश खोतकर यांनी केला. या संदर्भात सखोल तपास करण्याची आवश्यकता असल्याची खोतकर यांनी सांगितले.