बजेटमधील घरांच्या निर्मितीला वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:56 AM2018-02-23T02:56:11+5:302018-02-23T02:56:13+5:30
मुंबईत वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या शहराचा विकास झपाट्याने होत आहे.
नवी मुंबई : मुंबईत वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या शहराचा विकास झपाट्याने होत आहे. लोकसंख्येचा आलेख उंचावत आहे. अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आगामी काळात बजेटमधील घरांसाठी महाराष्ट्रावरील ताण कमी करण्याची क्षमता नवी मुंबई शहरात आहे, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला.
मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या वतीने वाशी येथे परवडणारी घरे आणि ब्ल्यू इकॉनॉमी या विषयावर एकदिवशीय विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. नवी मुंबईच्या विकासात सिडकोचे मोलाचे योगदान राहिले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत २० लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, त्यात नवी मुंबईचा हातभार मोठा असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे आता भूमिपूजन झाले आहे. एकूणच राज्याची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून नवी मुंबई शहराची ओळख निर्माण होत असल्याचे समाधान मेहता यांनी व्यक्त केले.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी प्रास्ताविकात परिषदेचा हेतू विशद केला. दहा वर्षांत १५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ब्ल्यू इकॉनॉमी अर्थात सागरी क्षेत्राशी संबंधित उद्योगांना देशाच्या अर्थकारणात मोठा वाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार नरेंद्र पाटील आदींची भाषणे झाली. परवडणारी घरे या विषयावरील चर्चासत्रात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी पंतप्रधान आवास योजनेची माहिती दिली. सिडकोचे मुख्य अभियंते केशव वडखेडकर, हुडकोचे कार्यकारी संचालक व्ही. टी. वालवान, क्रेडाईचे अध्यक्ष मयूरेश शहा आदींनी भाग घेतला, तर सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर यांनी ब्ल्यू इकॉनॉमी विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिली.