पनवेल : तालुक्यातील हरिग्राम येथे इमारतीत रूम बांधून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या साई गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पनवेल परिसरात स्वस्त घरांचे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळून बिल्डर पसार झाले आहेत. इमारत बांधून देतो असे सांगून ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले आहेत, मात्र आजतागायत ग्राहकांना इमारत बांधून दिली नाही. तसेच पैसे देखील परत देण्यात आलेले नाहीत. २०१३ ते २०१६ पर्यंत खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात जवळपास ४५ गुन्हे दाखल आहेत. नवीन पनवेल सेक्टर १७ येथे गणेश घाडगे व अरविंद विश्वकर्मा या बांधकाम व्यावसायिकाने कार्यालय थाटले होते. हरिग्राम या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु करतो असे सांगून त्यांनी ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये घेतले होते. चंद्रिका आर. यांनीही घरासाठी साई गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाकडे १० लाख रु पये भरले होते. मात्र २ वर्षे झाली तरी इमारत बांधण्यात आली नाही. शिवाय बांधकाम व्यावसायिक पैसे परत देण्यासही टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने चंद्रिका यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गणेश घाडगे व अरविंद विश्वकर्मा या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एच.डी. अहिरराव करत आहेत. (वार्ताहर)
१० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरवर गुन्हा
By admin | Published: January 01, 2017 3:25 AM