फसवणूकप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:07 AM2018-12-03T00:07:05+5:302018-12-03T00:07:08+5:30
ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ग्राहकांकडून रक्कम घेवून प्रत्यक्षात गृहप्रकल्प न उभारता फसवणूक केली होती. यामध्ये अद्यापपर्यंत ४४ लाख रुपयांचा अपहार उघड झाला असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
मोतीलाल गुप्ता, सूरज गुप्ता व दिनेश यादव अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरची नावे आहेत. त्यांनी श्री. श्री. सिद्धिविनायक बिल्डर्सच्या माध्यमातून कथित गृहकल्पातून ग्राहकांची फसवणूक केली आहे. पनवेलमधील आदई गाव येथे गृहप्रकल्प उभारणार असल्याचे सांगून त्यांनी ग्राहकांकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये घेतले होते. त्यानुसार खारघरचे विलास लोकरे यांच्यासह इतर १९ जणांनी घराच्या बुकिंगसाठी सन २०१२ मध्ये पैसे दिले होते. परंतु सहा वर्षांचा कालावधी होवूनही त्यांना घराचा ताबा दिला जात नव्हता. यामुळे काहींनी प्रत्यक्ष ठिकाणावर जावून पाहणी केली असता, तिथे कसलेच बांधकाम झालेले नसल्याचे आढळून आले. यावरून त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, बनावट गृहप्रकल्प दाखवून ग्राहकांचे पैसे लुबाडून फसवणूक केल्याचे समोर आले. यानुसार फसवणूक झालेल्या ग्राहकांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केल्याने गुन्हा दाखल केला आहे.