बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:38 AM2017-07-21T03:38:29+5:302017-07-21T03:38:29+5:30

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक मिलिंद पुरुषोत्तम देशपांडे यांची भोकरपाडामधील पाच जणांनी फसवणूक केली आहे. विक्री झालेल्या जमिनीची दुसऱ्यांदा विक्री

Builder fraud | बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पुणे येथील बांधकाम व्यावसायिक मिलिंद पुरुषोत्तम देशपांडे यांची भोकरपाडामधील पाच जणांनी फसवणूक केली आहे. विक्री झालेल्या जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रस्तावित विमानतळ प्रकल्पामुळे नैना क्षेत्रातील जमिनीचे भाव वधारले आहेत. राज्य व देशातील बांधकाम व्यावसायिक या परिसरात जमीन विकत घेत आहेत. जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक होण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. पुणे कोथरूड परिसरामधील बांधकाम व्यावसायिक मिलिंद पुरुषोत्तम देशपांडे यांनीही भोकरपाडा बारवई येथील ३८ गुंठे जमीन खरेदी केली होती. आयुष रिअ‍ॅल्टीचे विनायक खरात, मधुकर भाईर, प्रकाश राम चव्हाण यांच्या मध्यस्तीने त्यांनी जनार्दन दुध्या पाटील, रमेश पाटील, कमलाकर पाटील, तुकाराम पाटील, सुनीता बेडेकर यांच्याबरोबर प्रतिगुंठा ४ लाख १० हजार याप्रमाणे जमीन खरेदीसाठीचा व्यवहार केला होता. पूर्ण जमिनीसाठी १ कोटी ५९ लाख ९० हजार रुपये मोबदला देण्याचे निश्चित केले होते.
करार करताना साक्षीदार म्हणून मधुकर भोईर व प्रकाश चव्हाण यांनी सही केली होती. या व्यवहारासाठी तत्काळ १० लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित ४० लाख रुपये खरेदीखत करण्याच्या वेळी व उर्वरित ५० लाख खरेदीखत झाल्यानंतर १५० दिवसांमध्ये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जमिनीची मोजणी केल्यानंतर ती १ गुंठा कमी झाल्याने हा व्यवहार १ कोटी ५५ लाख ८० हजार रुपयांना निश्चित झाला. कराराप्रमाणे जमिनीचे खरेदीखत करताना जनार्दन पाटील यांना २१ लाख, रमेश पाटीलला १३ लाख, कमलाकर यांना ९ लाख, तुकाराम यांना ६ व सुनीता सीताराम बेडेकर यांना २ लाख रुपये देण्यात आले. डिसेंबर २०१६मध्ये हा व्यवहार करण्यात आला होता.
जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७मध्ये जमिनीच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी फोन करून तुमच्या जमिनीवरील गवत आम्ही कापू का? अशी विचारणा केली. त्यांना त्याविषयी परवानगी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या नागरिकांचा फोन आला की आम्हाला काही जणांनी गवत कापण्यास विरोध करून जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. यानंतर देशपांडे यांनी संगणकावर तपशील मिळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही जमीन जनार्दन पाटील यांनी चेंबूरमधील एस. एम. राजा अण्णा मलाई याला विकली असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पनवेल दुय्यम निबंधक कार्यालयातून माहिती घेतली असता जमीन मलाई यांना विकल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीच विकलेल्या जमिनीचा पुन्हा व्यवहार करून ५१ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याबद्दल मिलिंद देशपांडे यांनी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

व्यवहारासाठी तत्काळ १० लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित ४० लाख रुपये खरेदीखत करण्याच्या वेळी व ५० लाख खरेदीखत झाल्यानंतर १५० दिवसांमध्ये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जमिनीची मोजणी केल्यानंतर ती १ गुंठा कमी झाल्याने हा व्यवहार १ कोटी ५५ लाख ८० हजार रुपयांना निश्चित झाला होता.

Web Title: Builder fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.