मयूर तांबडे पनवेल : बांधकाम व्यावसायिकांना ही दिवाळी थंड गेल्याचे चित्र आहे. नवीन ग्राहक येत नसल्यामुळे दिवाळीत बुकिंगला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विकासकांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प आल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना नैनाची परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे बहुतांशी बिल्डरांना बांधकाम थांबवावे लागले आहे. शेकडो अनधिकृत इमारती परिसरात उभारल्या गेल्या आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक नवीन पनवेल, पनवेल, खांदा कॉलनी परिसरात वातानुकूलित कार्यालय थाटून बसले आहेत. दिवाळीसाठी बुकिंग करणा-या ग्राहकांसाठी विशेष सवलत तसेच सूट देऊनही ग्राहक फिरकले नाहीत. तसेच रेरा कायद्यामुळे बहुतांशी बांधकाम व्यावसायिकांना नवीन इमारती सुरू करता आल्या नाहीत. परिणामी, दिवाळीच्या उत्सवात नवीन बुकिंग न झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.पनवेल तालुक्यात दिवसाला नवीन बांधकाम व्यावसायिकांची भर पडत आहे. नेरे, सुकापूर, शिवकर, विहिघर, कोप्रोली, आदई आदी भागांत सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. हजारो इमारतींचे बांधकाम परिसरात सध्या सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी चौकशीसाठी कार्यालयांमध्ये ग्राहकांची रेलचेल सुरू होती. मात्र, दिवाळीमध्ये ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी तालुक्यातील भगतवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तीन अनधिकृत इमारती सिडकोने जमीनदोस्त केल्या होत्या. अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कारवाईचा बडगा उगारल्याने विकासक धास्तावले आहेत. ग्राहक येत नसल्याचे कारण अनधिकृत बांधकाम असल्याचे बोलले जात आहे.
दिवाळीत बुकिंगला फारसा प्रतिसाद न मिळाल्यानं बांधकाम व्यावसायिकांचे निघाले दिवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:22 AM