शहरातील बिल्डर्स तणावाखाली

By admin | Published: May 11, 2016 02:24 AM2016-05-11T02:24:30+5:302016-05-11T02:24:30+5:30

स्वराज डेव्हलपर्सचे मालक राज खंदारी यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत.

Builders of the city under stress | शहरातील बिल्डर्स तणावाखाली

शहरातील बिल्डर्स तणावाखाली

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
स्वराज डेव्हलपर्सचे मालक राज खंदारी यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. पुनर्विकासासह नैना परिसरात बिल्डरांची अडवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. सिडकोसह महापालिका वेळेत परवानगी देत नाही. अर्थकारणासाठी राजकीय हस्तक्षेप वाढत आहेत. प्रकल्पामध्ये अडथळे आणण्याचे प्रमाणही वाढत असल्यामुळे बांधकाम व्यवसायिक तणावाखाली आहेत.
ठाण्यामधील सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बांधकाम व्यावसायिकांची प्रशासन व राजकारण्यांकडून अडवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रस्तावित विमानतळ, नैना क्षेत्र, सिडकोमुळे बांधकाम व्यवसायाला सर्वात चांगली संधी नवी मुंबईमध्ये आहे. देशातील व राज्यातील नामांकित बिल्डर या ठिकाणी गुंतवणूक करू लागले आहेत. नागरिकांना स्वस्त दरामध्ये घर उपलब्ध होण्यासाठी शासनाने बांधकामांच्या परवानग्या वेळेत मिळाव्या व या व्यवसायासमोरील अडवणी सोडविणे आवश्यक आहे. परंतु हा व्यवसाय व व्यावसायिक अडचणीत येईल, अशी धोरणे आखली जात असल्याचे स्वरात डेव्हलपर्र्सच्या राज खंदारी यांच्या आत्महत्येमुळे स्पष्ट झाले आहे.
शासनाने विमानतळ प्रभावित क्षेत्रामध्ये (नैना) योग्य नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. सिडकोला अधिकार मिळून तीन वर्षे झाली. या कालावधीमध्ये व्यावसायिकांनी तब्बल २५१ प्रकल्प मंजुरीसाठी सिडकोकडे सादर केले आहेत. परंतु प्रत्यक्षात २९ प्रकल्पांनाच परवानगी देण्यात आली आहे.
कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे कारण देऊन उर्वरित परवानग्या थांबविण्यात आल्या आहेत. सिडको अडवणूक करीत असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक करू लागले आहेत. सिडकोच्या माहितीप्रमाणे तीन वर्षांत २९ म्हणजे वर्षाला सरासरी १० प्रकल्पांना परवानगी दिली जात असेल तर विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरामध्ये जमीन खरेदी करण्यापासून प्रकल्प उभारणीसाठी व्यावसायिकांनी करोडो रुपयांचे कर्ज घेतले आहे. अनेकांनी परवानगी वेळेत मिळेल या आशेने ग्राहकांकडून बुकिंग घेतली आहे, परंतु दिरंगाईमुळे सर्व नियोजनच रखडले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्येही व्यावसायिकांची अडवणूक सुरूच आहे. शहरात बांधकामासाठी भूखंड कमी राहिले आहेत. पुनर्विकासातूनच जमीन व नवीन घरे निर्माण होणार आहेत. शासनाने मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये अडीच एफएसआय मंजूर केला आहे. यामुळे धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला
होता.
वाशी व नेरूळमध्ये जवळपास १० प्रकल्पांना मंजुरीसाठी अर्ज नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु एक वर्षामध्ये अद्याप एकही परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे पुनर्विकासामध्ये गुंतवणूक करणारे व्यावसायिक व धोकादायक इमारतीमध्ये राहणारे नागरिक दोघेही असुरक्षित झाले आहेत. अशीच स्थिती राहिली तर बांधकाम व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.
> महापालिका क्षेत्रामध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामधील अर्थकारणामुळे वर्षभरापुर्वी व्यवसायीकांकडे काही शक्ती ३० टक्के वाटा मागत असल्याची चर्चा सुरू होती. नगरसेवक किशोर पाटकर यांनी मनपा सभागृहातही याचे सुतोवाच केले होते. याशिवाय श्रेय व अर्थकारणासाठी प्रकल्पांना मंजूरी मिळू न देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
> सिडकोने नयना क्षेत्रामधील प्रकल्प रखडविले असून त्यामुळेच खंदारी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची टिका केली आहे. परंतू सिडकोचे नैना प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य नियोजक व्ही. वेणू गोपाल यांनी आरोप फेटाळले आहेत. स्वराज डेव्हलपर्सने १३ मार्च २०१५ मध्ये नैना मधील वाकडी गावात ४१ हजार १७० चौरस मिटर क्षेत्रफळावर अकृषक परवान्यासाठी अर्ज केला होता. अर्जदाराने जुलै ते सप्टेंबर दरम्यान चारवेळा अर्ज केला. परंतु परवानगीपुर्वीच स्टिल्ट अधिक तिन मजले एवढे बांधकाम केले होते. बांधकामाच्या आराखड्यात बदल सुचविले होते. परंतू प्रत्यक्षात अर्ज सादर झाला नसल्याचे स्पष्ट केले.
> लालफीतशाही थांबवा
नयनासह नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये बिल्डरांची अडवणूक करण्याचे धोरण आखले जात आहे. सहजासहजी बांधकाम परवानगी दिली जात नाही. प्रकल्प रखडविल्याने त्यावरील खर्च वाढत आहे. विकासकाने घेतलेल्या व्याजाचे हप्ते फेडताना तारेवरची कसरत करावी लागत असून लालफितशाही कारभार थांबविण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Builders of the city under stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.