पनवेल : घर देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषत: पनवेल परिसरात अशा प्रकाराच्या घटनांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशाच प्रकारचे आणखी एक प्रकरण उघड झाले असून, एका बिल्डरने घरासाठी नोंदणी करणाºया सुमारे ५०० ग्राहकांना २० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, या बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी रविवारी प्रस्तावित गृहप्रकल्पाच्या जागेवर हल्लाबोल आंदोलन केले.हनुमंत चव्हाण, असे या बिल्डरचे नाव आहे. चव्हाण याने वाशी आणि कळंबोली येथे आपले कार्यालय थाटले होते. पनवेल तालुक्यातील डेरवली व कोळखे पेठ येथे सायराज निवारा प्रोजेक्ट, गोल्डन एम्प्रेस, साईराज आर्केड या नावाने गृहप्रकल्प प्रस्तावित केले होते. या प्रकल्पातील घरांच्या बुकिंगच्या नावाखाली जवळपास ५०० ग्राहकांकडून लाखो रुपये उकळले. २०१२मध्ये ग्राहकांनी आपली जमापुंजी या बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पात गुंतवली. मात्र, सहा वर्षे होऊन देखील इमारतीच्या कामाला सुरु वात केली नाही. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी रविवारी डेरवली येथील इमारतीच्या जागेवर एकत्रित जमून बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. तसेच यासंदर्भात पुढील कार्यवाहीच्या दिशेने चर्चा करण्यात आली.बांधकाम व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून फसवले असल्याचा आरोप या वेळी ग्राहकांनी केला. प्रकल्प सुरू करताना बिल्डर हनुमंत चव्हाण याने बिनव्याजी घर, ग्राहकांसाठी नॅनो योजना आणल्या. त्याला प्रतिसाद देत सर्वसामान्य ग्राहकांनी यात गुंतवणूक केली. काही महिन्यांनंतर ठरल्याप्रमाणे या घरांचे हप्तेदेखील सुरू झाले. बिल्डर हनुमंत चव्हाण याने २०१५मध्ये सर्व गुंतवणूकदारांना त्याच्या हक्काच्या घराचा ताबा मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, घरांच्या कामाला सुरु वात झाली नाही. गेल्या चार वर्षांत कामाचा काहीच वेग वाढला नाही. बिल्डरकडून नेहमी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रविवारी डेरवली येथील जागेवर एकत्रित येऊन आपला रोष व्यक्त केला. तसेच या बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या बिल्डरविरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महारेराकडेही तक्रार नोंदविण्यात आल्याचे ग्राहकांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात बांधकाम व्यवसायिक हनुमंत चव्हाण याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकलानाही.फसवणूक झालेल्या ग्राहकांनी घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता, कोणी आपले दागिने विकले, कोणी गावची जमीन विकली, कोणी राहती झोपडी, तर कोणी कर्ज घेऊन काही लाखांची रक्कम बिल्डरला दिली; परंतु आता घरही नाही आणि भरलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता नसल्याने ग्राहकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.-विश्वास कळंबे, ग्राहक
बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप : ग्राहकांना २० कोटींचा गंडा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:27 AM