नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारूप विकास आराखड्यात फ्लेमिंगों अभयारण्याच्या परिसरात प्रस्तावित केलेले निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांचा वापरात बदल हे केंद्र आणि राज्यातील राज्यकर्त्यांच्या उद्योगपती दोस्तांसाठी केले आहेत. आपण पर्यावरणमंत्री असताना ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगाें अभयारण्य व्हावे, म्हणून प्रयत्न केले होते. येथील फ्लेमिंगाें अभयारण्य आणि परिसरातील खारफुटीही पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्या क्षेत्रावर काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नेरूळ येथील सभेत केली.
नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत. गद्दार एकनाथ शिंदेसोबत गेले आहेत. गेल्या दीड वर्षांत राज्यात एकही नवा उद्योग आलेला नाही. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला ॲडव्हाॅन्टेज महाराष्ट्रचा विसर पडला आहे. ते ॲडव्हाॅन्टेज गुजरातसाठी काम करीत आहेत. यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रासह राज्यात परिवर्तन अटळ आहे. या दौऱ्यात विविध ठिकाणच्या कार्यालयांच्या उद्घाटनासह सभांना त्यांनी संबोधित करताना ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. मागे मी ठाणे शहराचा दौरा केला तेव्हा पालकमंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना बेलापूर मतदारसंघ प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोली मतदारसंघ प्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला संघटक रंजना शिंत्रे, खासदार राजन विचारे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. नवी मुंबई दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी शहरात नेरूळ, इंदिरानगर, तुर्भे, घणसोली आणि ऐरोली येथे धावता दौरा करून सभांमधून नवी मुंबईकर आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी फोटो घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांना घेरल्याचे पाहायला मिळाले.