उद्यानाच्या भूखंडावर बांधकामाचे डेब्रिज
By admin | Published: August 24, 2015 02:40 AM2015-08-24T02:40:50+5:302015-08-24T02:40:50+5:30
घणसोली येथील उद्यानाची भिंत तोडून त्यामध्ये बांधकामाचे डेब्रिज टाकण्यात आले आहे. यामुळे पालिकेच्या उद्यानाला अवकळा आली असून
नवी मुंबई : घणसोली येथील उद्यानाची भिंत तोडून त्यामध्ये बांधकामाचे डेब्रिज टाकण्यात आले आहे. यामुळे पालिकेच्या उद्यानाला अवकळा आली असून उद्यानाच्या जागेत डेब्रिजचे ढीग साचले आहेत. उद्यानालगतच्या खाजगी सोसायटीच्या बांधकामादरम्यान संबंधित विकासकाने हा प्रकार केला आहे.
सिडको आणि महापालिकेच्या हस्तांतर वादात घणसोली कॉलनी परिसर अडकलेला आहे. यामुळे परिसरातील उद्यान, खेळाची मैदाने यांचाही विकास रखडलेला आहे. विरंगुळ्यासाठी चांगली उद्यानेच नसल्याने स्थानिकांना उपलब्ध तुटपुंज्या सुविधेतच समाधान मानावे लागत आहे. अशातच उपलब्ध उद्यानाच्या जागेत डेब्रिज टाकल्याने स्थानिकांच्या गैरसोयीचा प्रकार सेक्टर ४ येथे घडला आहे. तेथील २४२ क्रमांकाचा भूखंड महापालिकेने उद्यानासाठी आरक्षित ठेवलेला असून काही प्रमाणात सुविधाही पुरवण्यात आल्या होत्या.
परंतु विभागाचे हस्तांतरण झालेले नसल्याने उद्यानाचा विकास रखडलेला आहे. यामुळे सध्या या उद्यानाचे प्रवेशद्वार तुटलेले असून आतमध्ये अनावश्यक जंगली झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे या उद्यानाची योग्य निगा राखून स्थानिकांना ते सुविधेसाठी उपलब्ध करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यापूर्वीच उद्यानाचा विकास रखडल्याचे हेरून त्याठिकाणी डेब्रिज टाकण्यात आले आहे. उद्यानालगत माथाडी कामगारांच्या सोसायटीसाठी भूखंड वितरित झालेला आहे.
सध्या या सोसायटीचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणच्या खोदकामातून निघालेले डेब्रिज उद्यानाच्या जागेत टाकले आहे. त्याकरिता विकासकाने उद्यानाच्या एका बाजूची भिंत देखील तोडली आहे.
तोडलेल्या भिंतीचे दगड सोसायटीचा पायाभरणा करण्यासाठी वापरल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या विकासकावर कारवाईची मागणी कृष्णा पाटील यांनी महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे. पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे विकासकावर कारवाई होणे आवश्यक असतानाही पालिकेचे अधिकारी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. (प्रतिनिधी)