राजकारणातील गुंडगिरी बनली चर्चेचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:44 AM2021-02-11T01:44:20+5:302021-02-11T01:44:35+5:30
पक्ष बदलला की गुंडगिरीचा आरोप : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर टीका सुरू
- नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी गुंडगिरीवरून एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष बदलला की संबंधीतांवर गुंडगिरीचा ठपका ठेवला जात आहे. विरोधात असला की गुंड व आपल्या पक्षात आला की जनाधार असलेला नेता अशी साेयीस्कर भूमिका घेतली जात असून हा मुद्दा शहरात चर्चेचा मुद्दा बनला आहे.
तुर्भे स्टोअर्समध्ये नुकत्याच झालेल्या भाजपच्या हळदी-कुंकू समारंभात आमदार गणेश नाईक यांनी केलेले भाषण समाज माध्यमांमधून व्हायरल होत आहे. गुंडगिरीला घाबरायचे नाही. कोणी धमकी दिली तर कधीही मला फोन करा. स्थानिकच नाही तर जे इंटरनॅशनल स्तरावरील डॉननासुद्धा गणेश नाईक माहिती आहे असे वक्तव्य केले होते. भाजप सोडून शिवसेनेत गेलेल्या सुरेश कुलकर्णी यांचे नाव न घेता तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात आम्ही त्याचे हेडमास्तर असल्याचा इशारा दिला आहे. या सभेनंतर गुंडगिरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तुर्भे स्टोअर्सचे नेते सुरेश कुलकर्णी यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला जात आहे. परंतु वास्तवात कुलकर्णी हे तब्बल २५ वर्षे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून वावरत होते व त्यांना परिवहन सभापती व तीन वेळा स्थायी समितीचे सभापतीपदही देण्यात आले होते. परंतु पक्ष बदलताच त्यांच्यावर टीका केली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष अशा प्रकारची सोयीस्कर भूमिका घेऊ लागले आहेत. यापूर्वी शिवसेना कुलकर्णी यांच्यावर गुंडगिरीची टीका करत होते. परंतु आता टीका करणारे नेते त्यांचा प्रचार करत आहेत.
नवी मुंबईमध्ये गुंडगिरीवरून सोयीस्कर भूमिका घेण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. सद्यस्थितीमध्ये शिवसेनेत असलेले माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे २००७ पर्यंत गणेश यांचे समर्थक होते. शिवसेना नेते पूर्वी त्यांच्यावर गुंडगिरीचा आरोप करत. परंतु चौगुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर टीका करणारे नेते त्यांचा प्रचार करू लागले व यापूर्वी त्यांचे समर्थन करणारे गणेश नाईक व त्यांचे पदाधिकारी चौगुले यांच्यावर टीका करू लागले. यादवनगरमधील माजी नगरसेवक रामअशिष यादव यांच्यावरही यापूर्वी शिवसेनेने अनेक वेळा गुंडगिरीचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. पण आता तेच यादव शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. यापूर्वी दिघा परिसरातील मुख्तार अंन्सारी हे राष्ट्रवादीत असताना शिवसेना नेते त्यांच्यावर गुंडगिरीची टीका करत नंतर तेच अन्सारी शिवसेनेचे पदाधिकारी झाले. नवी मुंबईमध्ये अशी अनेक उदाहरणे असून राजकीय पक्षांच्या सोयीस्कर भूमिकेविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड
नवी मुंबईमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांना पक्षात घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षप्रवेश देताना निवडून येण्याचा निकष पाहिला असून तत्त्वांना मुरड घातली जात आहे. गुन्हेगारीचा मुद्दाही सोयीनुसार वापरला जात आहे. आपल्याकडे असेल तर समाजसेवक व विरोधात गेला की गुन्हेगार अशी भूमिका घेतली जात आहे.