दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर योजना; दिवाळीच्या मुहर्तावर एकनाथ शिंदेंची घोषणा
By कमलाकर कांबळे | Published: October 24, 2022 04:46 PM2022-10-24T16:46:22+5:302022-10-24T16:47:38+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावलीच्या मुहूर्तावर सोमवारी या योजनेची घोषणा केली आहे.
नवी मुंबई: सर्वसामान्य घटकांसाठी घरांची निर्मित्ती करणाऱ्या सिडकोने दिवाळीच्या मुहर्तावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ७८४९ घरांची बंपर योजना जाहिर केली आहे. उलवे नोडमधील बामणडोंगरी आणि खारकोपर स्थानकाच्या परिसरात अत्याधुनिक प्रीकास्ट तंत्रज्ञानाद्वारे ही घरे बांधण्यात आली आहे.ही सर्व घरे परिवहन केंद्रीत व उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांयुक्त असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावलीच्या मुहूर्तावर सोमवारी या योजनेची घोषणा केली आहे. सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेमुळे हजारो कुटुंबाचे गृहस्वप्न पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबई शहराची निर्मित्ती करताना सिडकोने आतापर्यंत विविध घटकांसाठी दीड लाखांपेक्षा अधिक घरे बांधली आहेत. सर्वसामान्य घटकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार घरे घेता यावीत, याकडे सिडकोचा नेहमी कटाक्ष असतो. त्यानुसार मागील चार वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळपास २५ हजार घरे बांधून त्यांचे वाटप पूर्ण केले आहे.
अलिकडेच सिडकोने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळोजा नोडमधील ४१४९ घरांची योजना जाहिर केली होती. या घरांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ घेता यावा, यादृष्टीने अर्ज नोंदणीची मुदत ३ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही योजना सुरू असतानाच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर उलवे नोडमधील ७८४९ घरांची महायोजना जाहिर केली आहे. परिहवन केंद्रीत विकास संकल्पनेवर अधारित ही सर्व घरे बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानक परिसरात आहेत. या योजनेत २५ ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे. तर १९ जोनवारी २०२३ रोजी संगणकीय सोडत पार पडणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
उपलब्ध सदनिकांचा तपशील:
बामणडोंगरी, भूखंड क्रमांक २, सेक्टर ६ येथे ५१६० सदनिका तर
खारकोपर (पूर्व), भूखंड क्रमांक १ए, सेक्टर १६- २८८, खारकोपर (पूर्व), भूखंड क्रमांक २बी, सेक्टर १६- २८८ आणि खारकोपर (पूर्व), भूखंड क्रमांक ३, सेक्टर १६ए येथे २१३३ अशा एकूण ७८४९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
घराची किमत ३० ते ३५ लाख
परिवहन केंद्रीत विकास संकल्पनेवर अधारित प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून हे गृहप्रकल्प साकारण्यात आले आहेत. हे गृहसंकुल नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांच्या परिसरात आहेत. तसेच प्रस्तावित मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे उलवे नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे नोडपासून नजीकच्या अंतरावर आहे. गृहसंकुलांचा परिसर हा शाळा, महाविद्यालये, रुग्णालय इ. मूलभूत सुविधांनी परिपूर्ण आहे. त्यानुसार या गृहसंकुलातील घराची किमत ३० ते ३५ लाखांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी ७५ हजार रूपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उलवे नोडला महत्व प्राप्त होणार आहे. त्याअनुषंगाने या भागात घर घेवू इच्छिणाऱ्यांसाठी सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर परिवहन केंद्रीत विकास या संकल्पनेवर अधारीत घरे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर घेण्याची ही चांगली संधी असणार आहे. -डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको