नवी मुंबई: महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली. ठिकठिकाणी पडलेले फायलींचे गठ्ठे पाहून नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेबरोबर नीटनेटकेपणाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे जॉब कार्ड लिखित स्वरूपात देण्यात यावे. पुढील आठवड्यात पुन्हा पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका आयुक्तांनी बैठकांसह प्रत्यक्ष स्थळपाहणीचा सपाटा लावला आहे. रुग्णालयांसह शाळांना भेटी दिल्यानंतर सोमवारी महानगरपालिका मुख्यालयातील विविध कार्यालयांची पाहणी केली.
कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी फायलींचे गठ्ठे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. फाईल ठेवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या सूचनाही यावेळी केल्या. स्वच्छता व नीटनेटकेपणाला प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या असून पुढील आठवड्यात पुन्हा पाहणी करणार असल्याचा इशाराही दिला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्याच्याकडील जबाबदारीचे स्वरूप लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. जॉब चार्ट असलेच पाहिजे. कागदपत्र व नस्ती ठेवण्याची पद्धती शासकीय नियमावलीप्रमाणे असावी. फाईलसाठी कपाटांची संख्या वाढविण्याऐवजी जागेची उपलब्धता लक्षात घेऊन कॉम्पॅक्ट सिस्टीम कार्यान्वित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. हव्या असलेल्या माहितीसाठी डॅशबोर्डप्रत्येक विभागाचे डिजिटलायझेशन करून कामकाजाला गती द्यावी. केंद्रीय आवक-जावक कक्षामध्येही सर्व पत्रांची संगणकीय नोंद करण्यात यावी. पुढील कार्यवाहीचीही ई-ऑफिस पद्धतीमध्ये नोंद होणे आवश्यक आहे. कागदपत्रांचा वापर कमी करण्यासाठी विषयपत्रिका व इतिवृत्तही डिजिटल स्वरूपात करावीत. नगररचना विभागातील नकाशे व रेकॉर्ड यांचेही अत्याधुनिक पद्धतीने जतन करावे. ऑनलाइन परवाने देण्याची पद्धतही गतिमान करावी. प्रत्येक भूखंडाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, अशी यंत्रणा तयार करून परवाने संदर्भातील हवी असलेली माहिती त्वरित देण्यासाठी डॅशबोर्ड बनविण्याच्या सूचना केल्या. तसेच तळमजल्यावर हिकरणी कक्ष ठेवण्याची सूचना केली.
तळमजल्यावर वैद्यकीय कक्षमहानगरपालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर वैद्यकीय कक्ष तयार करावा. तेथे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावा. मुख्यालयात एक रुग्णवाहिकाही उपलब्ध असावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी व त्याविषयी फलक लावण्यात यावेत, अशा सूचनाही यावेळी केल्या.