‘त्या’ चौदा गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको! गणेश नाईक यांची भूमिका
By कमलाकर कांबळे | Published: September 1, 2024 09:16 PM2024-09-01T21:16:56+5:302024-09-01T21:18:02+5:30
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. या गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. खर्चाचा हा भार नवी मुंबई महापालिकेवर नको, अशी भूमिका आमदार नाईक यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यास आपला विरोध कधीच नव्हता आणि आजही नाही, परंतु त्यामुळे नवी मुंबईकरांवर अन्याय होणार असेल, तर गप्प बसणार नाही. कारण, या गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पायाभूत सुविधांचा बोजवरा उडाला आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभारली आहेत. नवी मुंबईत ही गावे समाविष्ट केल्यास महापालिकेवर आर्थिक भार पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीए किंवा सिडकोच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा. नवी मुंबईकरांच्या कररूपी पैसा येथील पायाभूत सुविधांवर खर्च होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनाही भूमिका कळविली आहे.
- गावांच्या समावेशासाठी तीन अटी
भौगोलिकदृष्ट्या या चौदा गावांचा नवी मुंबईशी फारसा संबध नाही. असे असतानाही या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याअगोदर पारसिक डोंगरातून एक बोगदा काढून चौदा गावांना जोडणारा रस्ता तयार करावा. चौदा गावांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ७,००० कोटींचा खर्च लागणार आहे. याचा खर्च एमएमआरडीए, सिडको किंवा इतर प्राधिकरणाला करण्यास सांगावे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना आमदार नाईक यांनी केली आहे.
त्या चौदा गावांचा अनियंत्रित विस्तार झाला आहे. पुढील काही काळात येथील लोकसंख्या वीस लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. मागील पाच वर्षांत अनियंत्रित व अनियोजित खर्चामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. अशा परिस्थितीत ही चौदा गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करून नवी मुंबईकरांवर अन्याय होऊ देणार नाही. - गणेश नाईक, आमदार, भाजप.