नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कमी भाडे आकारून शहरातील मैदाने खासगी कार्यक्रमांसाठी देण्यात येतात. कार्यक्रमानंतर मैदान स्वच्छतेची जबाबदारी आयोजकांची असूनही अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मैदानांमध्ये पडलेला कचरा महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना उचलावा लागत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
शहरात सांस्कृतिक कार्यालयांचे भाडे जास्त असल्याने तसेच वापरासाठी जागाही कमी मिळत असल्याने महापालिकेच्या परवानगीने शहरातील मैदाने भाड्याने देण्यात येतात. मैदानाच्या वापरासाठी महापालिकेच्या माध्यमातून अत्यल्प दरात भाडे आकारण्यात येते. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी विविध आकर्षक सेट उभारून विवाह सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, साखरपुडा आदी कार्यक्रम राबविण्यात येतात.
कार्यक्रमासाठी महापालिकेची परवानगी घेताना आयोजकांना मैदानाचे नुकसान होऊ नये, कार्यक्रमांनंतर स्वच्छता करण्यात यावी, अशा अटी-शर्तींची माहिती देण्यात येते; परंतु कार्यक्रमानंतर आयोजकांकडून मैदान स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. कार्यक्र मानंतर मैदानात मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून, उरलेले अन्नही टाकले जात आहे. यामुळे खेळाडूंनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मैदानाच्या स्वच्छतेकडे आयोजकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने स्वच्छतेचा अतिरिक्त भार महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मैदानांची स्वच्छता न करणाºया आयोजकांची अनामत रक्कमही जप्त करण्यात येत नसून, नियमांची पायमल्ली करण्यासाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.