उल्हासनगर : शहरातील अयप्पा मंदिराशेजारी राहणारे भंगाळे यांचा मृत्यू झाला असून, कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह गावी नेला आहे. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली असून, अयप्पा मंदिराचे टाळे तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात प्रसिद्ध अयप्पा मंदिर आहे. मंदिरात सोने-चांदीचे दागिने असल्याच्या हेतूने चोरट्यांनी मंदिराचे टाळे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती स्थानिक सेना विभागप्रमुख राजू माने यांनी दिली आहे. त्याच रात्री परिसरातील भंगाळे यांच्या घरात चोरी झाली असून लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. भंगाळे यांचे घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन लाखोंचा माल लंपास केला असून, इतर चार ते पाच घरांचे टाळे तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस गस्त वाढविण्याची मागणी राजू माने यांनी केली आहे. भंगाळे यांचे कुटुंब गावावरून परत आल्यावर किती लाखांची चोरी झाली,ते उघड होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात घरफोडी
By admin | Published: November 16, 2015 3:39 AM