उन्हाळ्याच्या सुटीमध्ये घरफोडीचे सत्र
By Admin | Published: May 12, 2017 01:56 AM2017-05-12T01:56:56+5:302017-05-12T01:56:56+5:30
नागरिक उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी तीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नागरिक उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी झाली असून रोख रकमेसह ३ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
सीबीडी सेक्टर ८ मधील रो हाऊसमध्ये राहणारे व्यावसायिक भगवानभाई मौवलीया नातेवाइकाच्या लग्नासाठी ७ मे रोजी गुजरातला गेले होते. लग्नावरून परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आतमधील ५९ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. पनवेल सेक्टर ४ करंजाडे येथे नीळकंठ कृपा इमारतीमध्ये राहणाऱ्या मुकेश पाठक यांच्या घरामध्ये कोणी नसताना चोरट्यांनी बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमधील २ लाख ४१ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. ८ ते १० मे दरम्यान ही घटना घडली आहे. पाठक कुटुंबातील सदस्य बुधवारी घरी आल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली असून याविषयी पनवेल पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
खारघर सेक्टर १६ मधील अंकित गोविंद नागर यांच्या घरामध्येही चोरी झाली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून आतमधील दागिने, कॅमेरा, घड्याळ, लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेले आहेत. तीनही घटनांविषयी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.