घरफोडीने सीबीडी परिसर हादरला; ३० तोळे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:17 AM2020-10-06T00:17:37+5:302020-10-06T00:17:41+5:30
१ लाख ६० हजार रुपयांची रोकड लंपास
नवी मुंबई : रविवारी रात्री घरफोडीने सीबीडी परिसर हादरला. सेक्टर ३ मधील एक घरातून जवळपास ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम पळवून नेण्यात आली. जवळपास ९ लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेण्यात आले आहेत.
नवी मुंबईमध्ये चोरी व घरफोडीच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. बंद घराचे कडी कोयंडे तोडून चोरटे आतमधील दागिने व किमती वस्तू घेऊन पळ काढत आहेत. सीबीडी सेक्टर ३ मधील बी १० टाइप इमारतीमध्ये राहणाऱ्या गजानन भंडारे यांच्या घरातही रविवारी चोरीची घटना घडली. वडिलांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य कामोठे येथे गेले होते. सोमवारी सकाळी तेथून सीबीडीला परत आल्यानंतर, दरवाजाचे टाळे तुटले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहिले असता, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील दोन मंगळसूत्र, दोन बांगड्या, सोनसाखळ्या, अंगठ्या, सोन्याचे हार, कर्णफुले असे जवळपास ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले आहेत. घरात ठेवलेली १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेली आहे.
या प्रकरणी भंडारे यांनी तत्काळ सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
युद्धपातळीवर तपास व्हावा : एकाच घरातून जवळपास ३० तोळे सोने व रोख रक्कम चोरीला गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा यद्धपातळीवर तपास करून आरोपींना गजाआड करावे. आरोपींना लवकर पकडल्यास परिसरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होईल, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे. परिसरातील सीसीटीव्हीही तपासण्यात यावेत, अशी मागणीही केली आहे.