पनवेल : पनवेलजवळ रविवारी तीन वेगवेगळे अपघात झाले. यातील दोन अपघातांत कारने रस्त्यावर अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे, तर तिसऱ्या घटनेत सायन-पनवेल महामार्गावर कामोठे उड्डाणपुलावर काम सुरू असल्याने चालकांना अंदाज न आल्याने ट्रक पलटी झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सकाळी १0च्या सुमारास किलोमीटर १५ जवळ मुंबई लेनवर पहिला अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एर्टिगा कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळाली. यावेळी घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध न झाल्याने कार खाक झाली. दुसरी घटना पनवेल शहरात घडली. पनवेल एसटी डेपोच्या मागील बाजूस तक्का गावाकडे जाणाºया मारु ती कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यातही संपूर्ण कार जळाली. पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.याशिवाय तळोजा आणि कळंबोली पुलाजवळही कारला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सायन-पनवेल महामार्गावर कामोठे उड्डाणपुलावर घडली. येथील उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकरिता उड्डाणपुलाच्या लेनवर खोदकाम करण्यात आले आहे. याठिकाणाहून मुंबईकडे जाणाºया लेनचा अंदान न आल्याने एक ट्रक (एमएच ०४ एफपी१८५२) पलटी झाला. यात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अखेर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. या वेळी घटनास्थळी कळंबोली वाहतूक शाखेचे कर्मचारीउपस्थित होते.
तापमानाचा पारा चढलातापमानाचा पारा वाढल्याने कारला आगी लागण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याआधी खारघरजवळ एका कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. उन्हामुळे कार तापत असून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कारमालकांनी गाडीचे नियमित सर्व्हिसिंग करणे गरजेचे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.