पनवेल : खांदा वसाहतीतील सेक्टर ८ मध्ये महानगर गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना रविवारी सायंकाळी सिडकोची खांदा वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तुटल्याने परिसरातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
तुटलेली जलवाहिनी एफआरपी स्वरूपाची अत्यंत जुनाट असल्याने दुरुस्तीला बराच काळ लागला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, सोमवारीही रहिवाशांना अपुºया पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून खांदा वसाहतीत वारंवार अपुºया पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे पाणीपुरवठा खंडित झाल्याने कामावर जाणाºया नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पाणीपुरवठा खंडित झाल्याचे योग्य कारणही सिडकोमार्फत नागरिकांना देण्यात न आल्याने दैनंदिन कामाचा पुरता बोजवारा उडाला.
खांदा वसाहतीतील २०पेक्षा जास्त सोसायट्यांना अचानक उद्भवलेल्या समस्येचा पाणीटंचाईचा सामन करावा लागला, तर अनेकांनी टँकरच्या पाण्याचा आधार घेतला. महानगर गॅसवाहिनी टाकताना लोकांच्या तोंडचे पाणी पळाल्याची परिस्थिती खांदा वसाहतीत सध्या उद्भवली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी राहुल सरोदे यांनी दिली. गॅसवाहिनी टाकताना पुरेशी काळजी न घेतल्याने, कामात हलगर्जी करणाºया महानगर गॅस प्रशासनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सरोदे यांनी दिली.
खांदा वसाहतीसह सिडकोचे विविध नोड, पनवेल शहरात अनेक ठिकाणी वारंवार होणाºया अपुरा पाणीपुरठ्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी खारघर सेक्टर १० मध्ये असाच प्रकार घडला होता. यावेळीदेखील सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी गजानन दलाल यांनी जलवाहिनी फोडणाºया कंत्राटदारावर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, हजारो लीटर पाणी वाया जाऊनदेखील कंत्रादारावर कोणतीच कारवाई झाली नाही.