प्रशांत शेडगे, पनवेलगेली अनेक वर्षे रखडलेला पनवेल बसस्थानकाचा मेकओव्हर करण्यास एसटी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या माध्यमातून विकास करण्याकरिता अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या जागेवर बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याने परिसराचा लूक बदलणार आहेच; त्याचबरोबर समस्यांच्या चक्र व्यूहात सापडलेल्या पनवेल बसस्थानकाची साडेसातीही संपणार आहे. पनवेल बस स्थानकाची अतिशय दुरवस्था झाली होती. त्याचबरोबर मुख्य इमारत धोकादायक जाहीर केल्याने ती जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे घाटमाथा आणि कोकणात जाणाऱ्या बस गाड्यांकरिता समोरच्या स्थानकात सोय करण्यात आली आहे. त्यासाठी तात्पुरती डागडुजीही करण्यात आली आहे. असे असले तरी पनवेल आगार आणि स्थानकांमध्ये सुविधांची वानवा आजही जाणवते. पनवेल बस स्थानकाचे सुशोभिकरण करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्याकरिता वारंवार पाठपुरावा केला आहे. पनवेल बस स्थानकाचा विकास व्हावा, हा त्यांचा प्रस्ताव एसटी महामंडळाने मान्य केला होता. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता.मध्यंतरी परिवहन विभागाने या प्रकल्पाला मंजुरी देऊन आराखडाही संमत केला, त्याचबरोबर महामंडळाने या कामाची निविदाही प्रसिद्ध केली होती. मात्र दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी मोक्याच्या ठिकाणी बीओटी तत्त्वावर विकास करायचा नाही, अशी भूमिका घेतली. स्वखर्चाने इमारत बांधण्याची एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती नसल्याने अन्य १२ बस स्थानकांप्रमाणे पनवेल स्थानकाचाही विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. बसपोर्टमध्ये तळमजल्यावर बसथांबा, प्रवासी विश्राम कक्ष तसेच इतर सुविधा; तर दुसऱ्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी असे नियोजन सुरू आहे.कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान : आगारात काम करणारे वाहक, चालक, वाहतूक नियंत्रक, लेखनिक, आगार व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी १०,००० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली इमारत बांधण्यात येणार आहे.तळमजला १,६०० पहिला, दुसरा, तिसरा, चौथा मजला २,१०० चौ.मीटर असणार आहे.
बसस्थानकाचा मेकओव्हर
By admin | Published: February 06, 2016 2:25 AM