नवी मुंबई : टुरिस्ट कारच्या धडकेने एनएमएमटीचा बसथांबा ढासळल्याचा प्रकार ऐरोलीत बुधवारी घडला. कार चालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात घडला असून सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही. परंतु या प्रकारामुळे शहरातील एनएमएमटीच्या बसथांब्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ऐरोली येथे दिवा नाक्यालगत बुधवारी दुपारी हा अपघात घडला. ऐरोलीच्या दिशेने जाणारी टुरिस्ट कार (एमएच ०३ बीसी ८२८९) त्याठिकाणच्या बसथांब्याला धडकली. यावेळी कारचालक हा शहरात नवीन असल्यामुळे जीपीएसच्या माध्यमातून निश्चित मार्ग पाहण्यात व्यस्त होता असे समजते. त्यामुळे रस्त्यावरुन त्याचे लक्ष हटल्याने कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकारात बसथांबा एका बाजूने खाली ढासळला आहे. सुदैवाने या प्रकारात कोणाला दुखापत झाली नाही. जर बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना कार धडकली असता किंवा थांबा कोणाच्या अंगावर कोसळला असता तर जीवितहानी घडली असती. मात्र या प्रकारावरून एनएमएमटीच्या बसथांब्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून एनएमएमटीने प्रवाशांच्या सोयीसाठी बसथांबे उभारलेले आहेत. त्यापैकी अनेक थांबे दुरवस्थेत असून, काही थांबे चुकीच्या ठिकाणी बसवल्यामुळे ते वापराविना पडून आहेत. यामुळे बसथांब्यांवर प्रशासनाने केलेला खर्च व्यर्थ असल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
ऐरोलीत कारच्या धडकेने बसथांबा ढासळला
By admin | Published: July 07, 2016 3:06 AM