- नामदेव मोरे
नवी मुंबई : रेल्वे बंद असल्यामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांसाठी प्रवाशांना एनएमएमटीचाच आधार भेटू लागला आहे. प्रतिदिन पावणेदोन लाख नागरिकांना उपक्रमाच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. कमी प्रवासी घेऊन जावे लागत असल्याने उपक्रमाचा तोटा वाढत असतानाही जास्तीतजास्त बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध देण्यासाठी एनएमएमटी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. रेल्वेसेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे, पनवेल व नवी मुंबईमधील विविध शासकीय कार्यालय, रुग्णालयात पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यावेळी एनएमएमटीने कोरोना योद्ध्यांसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या.
सुरुवातीच्या काळात प्रतिदिन १० हजार कर्मचाऱ्यांना सेवा दिली जात होती. सर्व कार्यालये सुरू झाल्यानंतर ६ जूनपासून सर्व कर्मचाऱ्यांना एनएमएमटीचाच आधार मिळत आहेत. उपक्रमाच्या ३६२ बसेस नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, पनवेल, उरण, मुंबई व इतर परिसरात सेवा पुरवत आहेत. शासनाने सुरक्षित अंतर ठेवून व गर्दी नियंत्रणात ठेवून सेवा पुरविण्यास परवानगी दिली आहे. ही सेवा देताना उपक्रमाचे जवळपास ५० टक्के नुकसान होत आहे.
कोरोनाच्या पूर्वी एनएमएमटीला प्रतिदिन ४० लाख रुपये उत्पन्न हाेत होते. ते २२ लाखांवर आले आहे. मासिक तोटा ६ कोटींवरून ८ कोटीवर पोहोचला असून, यानंतरही उपक्रमाने प्रवाशांच्या सुविधेसाठी नियमित सेवा सुरू ठेवली आहे.रुग्णांसाठी ३७ बसेस उपलब्ध करून दिल्या असून, रुग्णवाहिकेची कमतरता दूर झाली आहे. रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी व इतर सुविधांसाठी या बसेसचा वापर केला जात आहे. रुग्णांसाठी एनएमएमटी जीवनवाहिनी ठरली आहे.
मजुरांनाही दिला होता आधारलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी निवासस्थानापासून पोलीस व रेल्वे स्टेशनपर्यंत एनएमएमटीने विशेष सेवा पुरविली होती. तब्बल ३९ हजार ७४६ मजुरांना या काळात सुविधा दिली होती. यासाठी जवळपास एक हजार फेऱ्या मारल्या होत्या. राज्यातील स्थलांतरित मजुरांसाठीही २५ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जास्तीतजास्त प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीस अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व आता सर्व प्रवाशांना सेवा पुरवितानाच कोरोना रुग्णांसाठी बसेसच रुग्णवाहिकेतही रूपांतर करण्यात आले आहे.- शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी