नवी मुंबई : शहरात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी दिलेल्या मुदतीच्या आत परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक असते. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणेसुद्धा आवश्यक असते. परंतु या वर्षी कोरोना संसर्गामुळे अनेक व्यावसायिकांना परवान्यांचे नूतनीकरण करणे शक्य झाले नाही. परंतु आता अनलॉक अंतर्गत खानावळी, उपाहारगृहे, लॉजिंग बोर्डिंग, स्वीट मार्ट, केक शॉप, आईस्क्रीम पार्लर, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर आदी व्यवसाय पूर्ववत सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने नियमानुसार आपल्या व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे नवी मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज महापालिकेने व्यवसाय परवाना देण्याची व नूतनीकरण करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ केली आहे. ही सुविधा ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी ३१ डिसेंबर २0२0 पूर्वी ऑनलाइन अर्ज करून व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
३१ डिसेंबरपर्यंत करता येणार व्यवसाय परवाना नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:33 PM