पदपथावरील व्यवसाय धोकादायक; नवी मुंबईसह पनवेलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:42 AM2019-06-02T00:42:26+5:302019-06-02T00:42:36+5:30

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे.

The business on the pavement is dangerous; Types of Panvel in Navi Mumbai | पदपथावरील व्यवसाय धोकादायक; नवी मुंबईसह पनवेलमधील प्रकार

पदपथावरील व्यवसाय धोकादायक; नवी मुंबईसह पनवेलमधील प्रकार

Next

नवी मुंबई : सुनियोजित शहरात पदपथांवरील खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यास संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच आक्षेप घेतला गेला आहे. त्याशिवाय हे पदार्थ बनविताना अवलंब करण्यात येणाºया धोकादायक प्रणालीलाही वारंवार विरोध केला जात आहे; परंतु त्यानंतरही पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रीचा हा धोकादायक व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईसह पनवेल शहरातील पदपथ तसेच स्थानक परिसरात अशाप्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: नागरी आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर निर्बंध घालताना संबंधित प्रशासनाला अवघड होऊन बसले आहे. पदपथावर वडापाव, पाणीपुरी, रगडा पॅटीस, सॅण्डविच, इडली-डोसा, छोले भटोरे तसेच विविध शीतपेयांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याचे वारंवार सांगितले जाते. नागरिकांनी असे पदार्थ खाणे टाळावे, यासंदर्भात आरोग्य विभागाकडून नियमित आवाहन केले जाते; परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

शहरवासीयांची ही मानसिकता पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ बनविण्यची जागा अत्यंत घाणेरडी असते, त्यासाठी वापरली जाणारी भांडीसुद्धा अस्वच्छ असतात. भांडे धुण्यासाठी आणि खाद्यपदार्थ बनविण्यासाठी अनेक ठिकाणी सुलभ शौचालयाच्या नळाचे पाणी वापरले जाते. अनेक प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. ठाण्यातील एका पाणीपुरी विक्रेत्याने केलेला प्रकार तर जगजाहीर आहे. ही वस्तुस्थिती असतानाही नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रात पदपथासह, मार्जिनल स्पेस आणि मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

नवी मुंबईतील विविध नोडमधील पदपथ आणि मार्जिन स्पेसवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपले बस्तान ठोकले आहे. विशेषत: वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली परिसरात अशाप्रकारच्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कृषी मालाचे दररोज शेकडो ट्रक येतात, त्यामुळे मार्केट आणि परिसरात २४ तास रेलचेल असते. विशेषत: मध्यरात्रीनंतर खऱ्या अर्थाने बाजार तेजीत येतो. मार्केटमध्ये व्यापारी, ट्रकचालक, क्लिनर, कर्मचारी तसेच माथाडी व मापाडी आदीचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू होतो. त्यामुळे बाजार आवारात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ आणि चहाचे ठेले लागले आहेत. विशेष म्हणजे, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गॅसच्या शेगडीचा वापर केला जातो. सतत धगधगणाºया या शेगडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The business on the pavement is dangerous; Types of Panvel in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.