मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण पुन्हा जैसे थे; व्यावसायिकांवर कारवाईचा धाक दोन तासांपुरता
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 21, 2023 06:06 PM2023-12-21T18:06:33+5:302023-12-21T18:06:48+5:30
गुन्हे दाखल करण्याची मागणी
नवी मुंबई : सानपाडा येथे व्यावसायिकांनी बळकावले मार्जिनल स्पेस मोकळे करण्यात प्रशासन अपयशी पडताना दिसत आहे. पालिकेने दंडात्मक कारवाई केल्यानंतर दोन तासात पुन्हा दुकानाबाहेरील मोकळ्या जागेत बाकडे मांडले जात आहेत. यावरून व्यावसायिकांवर केवळ दोन तासांकरिता पालिकेच्या कारवाईचा धाक राहत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सानपाडा स्थानकाबाहेरच्या मुख्य मार्गावर वाहतुकीची व पादचाऱ्यांची कोंडी होत आहे. परिसरातील व्यावसायिकांकडून सरसकट मार्जिनल स्पेसचा वापर होताना दिसत आहे. त्याच ठिकाणी अन्न पदार्थ शिजवण्यासह इतर अनेक उद्योग चालत आहेत. यामुळे ग्राहकांची वाहने रस्त्यावर तर ग्राहक पदपथांवर गर्दी करत आहेत. याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना करावा लागत आहे. तर तुर्भे अथवा एपीएमसीकडे जाण्यासाठी सानपाडा स्थानकातून बाहेर पडताच नजरेस पडणारे हे चित्र पाहून अनेकजण मार्ग बदलत आहेत. ज्या इमारतींच्या तळाशी गाळ्यांमध्ये हा प्रकार चालत आहे, त्या सोसायटींनी देखील व्यावसायिकांना मार्जिनल स्पेस न बळकावण्याच्या लेखी सूचना केल्या आहेत. त्यानंतरही दुपटीने नफ्याच्या उद्देशाने एका परवान्यावर अनेक जोडधंदे करणारे व्यावसायिक कोणाला जुमानत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
बुधवारी तुर्भे विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्याठिकाणी कारवाई केली. परंतु पथकाने पाठ फिरवताच दोन तासात परिस्थिती जैसे थे पहायला मिळाली. यावरून त्यांच्यावर पालिकेच्या कारवाईचा देखील धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.