सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कंपन्यांमध्ये ठेका मिळवण्याच्या बहाण्याने उद्योजकांकडून पैसे उकळले जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अशा कथित ठेकेदारांच्या दहशतीखाली शहरातील उद्योजक दिसत आहेत. वेगवेगळे ठेके मिळवण्याच्या बहाण्याने होणाऱ्या या आर्थिक पिळवणुकीविरोधात त्यांनी यापूर्वी पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केलेली आहे.लेबर कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याने कंपनीच्या मॅनेजरला डांबून ठेवून मारहाण केल्याचा प्रकार तीन दिवसांपूर्वी रबाळे एमआयडीसी परिसरात घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना अटकही केलेली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील औद्योगिक पट्ट्यात असे प्रकार सुरूच असून, अनेक प्रकरणे भीतीपोटी दडपलीही जात आहेत. मात्र, सातत्याने घडणाºया अशा प्रकारांवरून आशिया खंडात मोठ्या असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक कथित ठेकेदारांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे. तर परिणामी काही उद्योजकांनी त्यांचे व्यवसाय इतरत्र हलवले आहेत. औद्योगिक क्षेत्रात एखादा नवा उद्योग सुरू होत असल्यास त्या ठिकाणी संबंधित सर्व प्रकारच्या कामाचा ठेका मिळवण्यासाठी कथित ठेकेदार व समाजसेवकांच्या रांगा लागत आहेत. अनेकदा एकापेक्षा जास्त व्यक्तींनी त्याच कामात रुची दाखवल्यास त्यांच्यातही वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. परिणामी, औद्योगिक क्षेत्रात सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर बहुतांश कथित ठेकेदार हे ठरावीक राजकीय पक्षांशी जोडले गेल्याचेही दिसून येते. यामुळे कंपनी मालकांची मुस्कटदाबी होत असून, इच्छा नसतानाही संबंधितांना ठेका द्यावा लागत आहे. त्यामध्ये कंपनी मोडीत काढल्यास भंगाराचे साहित्य जमा करणे, बांधकाम बांधणे, यापासून ते कामगार पुरवण्यापर्यंतच्या अनेक ठेक्यांचा समावेश आहे.मागील काही वर्षांपासून माथाडी कामगारांच्या नावे काम मिळवणाºया बोगस संघटनांचाही औद्योगिक क्षेत्रातील वावर वाढला आहे. एखाद्या कंपनी मालकाने अथवा मॅनेजरने कामाला नकार दिल्यास, कोणत्या ना कोणत्या मार्गाने कंपनीत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. अथवा दमदाटीचा वापर करून महिना ठरावीक रकमेची मागणी केली जाते, त्याकरिता जेवढे कामगार कामाला लावले आहेत, त्यापेक्षा जास्त कामगारांचा पगार काढून ती रक्कम अधिकृतरीत्या उत्पन्न म्हणून खिशात घालण्याचा प्रकार सध्या कथित ठेकेदारांकडून सुरू आहे.उद्योजक दहशतीतअशा अनेक प्रकारांनी त्रस्त असलेल्या उद्योजकांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून, ठेक्याच्या बहाण्याने खंडणी उकळण्याच्या प्रकाराला लगाम घालण्याची मागणी केली होती.त्यानंतर काही दिवस पोलिसांकडून औद्योगिक क्षेत्रात वावरणाºया कथित ठेकेदार व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर पाळतही ठेवली होती; परंतु पोलिसांची पकड सुटल्यानंतर पुन्हा हे कथित ठेकेदार डोके वर काढून उद्योजकांना खंडणीसाठी धमकावत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
ठेका मिळवण्यासाठी उद्योजकांना धमकावण्याचे प्रकार होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यापूर्वीच उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. जर उद्योजक व मॅनेजर यांना कामाचा ठेका मिळवण्यासाठी कसल्याही प्रकारचा त्रास दिला जात असल्यास त्यांनी तक्रार करावी.- पंकज डहाणे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१