पनवेलमध्ये होणार बसपोर्ट
By admin | Published: May 11, 2016 02:11 AM2016-05-11T02:11:13+5:302016-05-11T02:11:13+5:30
शहरातील बस स्थानकांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीने हालचाली सुरू केल्या आहेत. खासगी व सार्वजनिक सहभागातून पनवेल बस स्थानकाच्या जागेवर बसपोर्ट उभारण्यात येणार
पनवेल : शहरातील बस स्थानकांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीने हालचाली सुरू केल्या आहेत. खासगी व सार्वजनिक सहभागातून पनवेल बस स्थानकाच्या जागेवर बसपोर्ट उभारण्यात येणार असून, प्रकल्पाच्या आरखड्याकरिता खासगी सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. सोमवारी यादंर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली असून, पनवेलसह इतरही बस स्थानकांचा विकास करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पनवेल हे एकमेव मोठे आगार व स्थानक आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या पाच हजार गाड्यांसाठी या स्थानकात थांबा असल्याने प्रवाशांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्याचबरोबर आरक्षण व पार्सल या सुविधाही येथे पुरविण्यात येतात. या व्यतिरिक्त पनवेल बस स्थानकातून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उरण, वाशी, बेलापूर, अलिबाग, पेण, मुरुडसाठीही गाड्या सोडल्या जातात. मात्र या स्थानकाची दुरवस्था झाली होती. येथील मुख्य इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केल्याने ती जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाकडे जाणाऱ्या बस गाड्यांकरिता समोरच्या स्थानकात तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची सोय करण्यात आलेली आहे. सुविधांची वाणवा असलेल्या या बसस्थानकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एसटी महामंडळाने बस स्थानकांचा विकास करण्याचा प्रस्ताव मान्य केला होता.
परिवहन विभागाने या प्रकल्पाला मंजुरी देत आराखडाही संमत केला. त्याचबरोबर महामंडळाने या कामाची निविदाही प्रसिद्ध केली होती. मात्र दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी मोक्याच्या ठिकाणांचा बीओटी तत्त्वावर विकास करायचा नाही, अशी भूमिका घेतली होती. परंतु इमारत बांधण्यासाठी एसटीची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे इतर १२ बस स्थानकांप्रमाणे पनवेल स्थानकाचाही विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यानुसार बसपोर्टमध्ये तळमजल्यावर बसथांबा, प्रवासी विश्राम कक्ष तसेच इतर सुविधा देण्यात येणार आहेत.
दुसऱ्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय, तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. याकरिता 30 कोटी रुपये खर्च करून खासगी सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. प्रवाशांना अत्याधुनिक स्वरूपाच्या सोयी-सुविधांचा पुरविण्याचा महामंडळाचा मानस आहे.
(वार्ताहर)