कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:40 AM2018-03-17T02:40:51+5:302018-03-17T02:40:51+5:30
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाने राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे.
वैभव गायकर
पनवेल : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाने राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कर्नाळा अभयारण्यात बटरफ्लाय गार्डन ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे. फुलपाखरांना पोषक असे वातावरण निर्माण करून या गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडे देखील लावण्यात आली आहेत. हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. लवकरच पर्यटकांना या बटरफ्लाय गार्डनमध्ये फुलपाखरांसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.
कर्नाळा अभयारण्य हे पक्षिप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याठिकाणी देशी व विदेशी प्रजातीचे अनेक पक्षी आहेत. यामध्ये रानखाटिक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत. त्यामुळे पक्षिप्रेमींसाठी याठिकाणी एक पर्वणीच असते. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना नावीन्यपूर्ण पर्वणी देण्याच्या उद्देशाने वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी बटरफ्लाय गार्डन ही संकल्पना याठिकाणी राबवली आहे. पाच लाख रुपये निधी खर्च करून याठिकाणी १० बाय २० स्केअर मीटर परिसरात हे गार्डन उभारण्यात येत आहे. याअंतर्गत अडीच लाख रुपये खर्च करून गार्डनचे स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे, तर उर्वरित अडीच लाख रुपये खर्चून विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहे. यामुळे फुलपाखरे आकर्षित होणार आहेत. याठिकाणी १०० पेक्षा जास्त फुलपाखरांची रेलचेल असते त्यामुळे बच्चे कंपनीसाठी हे गार्डन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे पनवेलसह परिसरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. लहान मुलांसाठी फुलपाखरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याने याठिकाणी नजीकच्या काळात शाळेच्या सहली वाढणार आहेत. तसेच निसर्गप्रेमी, पक्षिमित्र आदी देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी येणार आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी ओपन जीम देखील उभारण्यात येत असल्याने हे गार्डन आबालवृध्दांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल.
>पर्यटकांची संख्या वाढावी, स्थानिकांचा रोजगार वाढावा या सर्व गोष्टीचा विचार करून हे गार्डन उभारण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर याठिकाणी कामाला सुरुवात झाली. या गार्डनमुळे नक्कीच पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.
- पी. पी. चव्हाण,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
कर्नाळा अभयारण्य