नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जास्तीत जास्त खरेदीदार परवाने मिळवून बोगस मतदार तयार केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन परवाने देताना संबंधीत व्यक्ती खरोखर खरेदीदार आहे का याची खात्री केली जावी अशी मागणी कांदा - बटाटा अडत व्यापारी संघटनेने केली आहे.एपीएमसीच्या यापुर्वीचे संचालक मंडळ डिसेंबर २०१४ मध्ये बरखास्त करून शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पाच वर्षांपासून प्रशासकीय मंडळ बाजारसमितीचे कामकाज पहात आहे. निवडणूका होईपर्यंत प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. निवडणूका घेण्यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने फेब्रुवारीमध्ये निवडणूका घेण्याचे लेखी म्हणने न्यायालयात सादर केले होते. डिसेंबरअखेरपर्यंत मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कांदा,भाजी व फळ मार्केटमध्ये जास्तीत जास्त खरेदीदारांचे परवाने मिळविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. संभाव्य उमेदवार बोगस मतदार नोंदणी करण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारसमितीवर प्रत्यक्ष व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे निवडून न येता बोगस मतदारांच्या बळावर खरेदीदारांचाच प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे.बाजारसमिती प्रशासनाने खरेदीदाराचे परवाने देताना संबंधीत व्यक्ती खरोखर खरेदीदार आहे का याची खात्री करावी. या परवान्याचा दुरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जावी अशी मागणी कांदा बटाटा आडत व्यापारी संघाने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी याविषयीचे पत्र प्रशासकांना दिले आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:02 AM