कोरोनामुळे दोन वर्ष आपल्या भूखंडाच्या मूळ दरात कोणतीही वाढ न करणाऱ्या सिडको महामंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी भूखंडाच्या मूळ किमतीत १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानुसार वाशी नोडमध्ये प्रति चौरस मीटरसाठी २२,४९० रुपये दर असणार आहे. नवी मुंबईतील हा सर्वाधिक दर आहे. बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केल्यानंतर आता सिडकोने भूखंडांच्या दरात तब्बल १५ टक्के वाढ केल्याने नवी मुंबईत घर घेणे आता आणखी महागणार आहे.
कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बांधकाम उद्योगाला बसला आहे. त्यामुळे बांधकाम उद्योगाला भरारी देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अनेक योजना जाहीर केल्या आहेत. भूखंड विक्री हाच महसुलाचा मुख्य स्रोत असलेल्या सिडकोची या काळात पंचाईत झाली. कारण सिडकोच्या माध्यमातून आपल्या भूखंडांच्या मूळ दरात १० ते १५ टक्के वाढ केली जाते. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रातील पडझड लक्षात घेऊन तसेच सर्वसामान्य ग्राहकांना भूखंडांत गुंतवणूक करता यावी, यादृष्टीने सिडकोने कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात आपल्या भूखंडाचे मूळ दर स्थिर ठेवले. सिडकोच्या भूखंडाच्या मूळ किमतीवरून खासगी प्रकल्पातील घरांचे दर निश्चित होतात.
दोन वर्षे सिडकोने जमिनीच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ न केल्याने नवी मुंबईतील घरांच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. मात्र, मागील काळात रिअल इस्टेट क्षेत्रात काहीसे तेजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने चालू आर्थिक वर्षासाठी जमिनीच्या मूळ किमतीत १५ टक्के वाढ केली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठी असणार आहे. दरम्यान, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांचे स्वप्न भंग पावणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नोडनिहाय निश्चित केलेले जागेचे दर (प्रति चौरस मीटर)ऐरोली १३,२२०घणसोली ११,४६०कोपरखैरणे १५,३९०वाशी २२,४९०सानपाडा १८,७८०नेरूळ १९,३१५सीबीडी बेलापूर १३,५४५खारघर १३,५४५नवीन पनवेल १२,५१०कळंबोली ९,५३०कामोठे ९,५३०द्राेणागिरी ९,८५०उलवे ८,७४५