लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त नवी मुंबईत सोमवारी विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.
यात वाशी गावातील मराठी शाळेत नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या माध्यमातून नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने युवा नेते निशांत भगत, समाजसेवक संदीप भगत यांच्या संयोजनाखाली सकाळी दि. बां.च्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, वाशी परिसरात स्वच्छतेत योगदान देणाऱ्या कचरा वेचक भगिनींच्या मुलांना पावसाळ्यात उपयोगी म्हणून रेनकोट आणि कचरा वेचक भगिनींना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमास दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण चळवळीतील नवीन मुंबई महापालिका क्षेत्रीय समन्वयक शैलेश घाग, साईनाथ पाटील, वाशीगाव ग्रामस्थ, भूमिपुत्र माथाडी कामगार युनियन, एकवीरा रिक्षा युनियन, इच्छापूर्ती सामाजिक विकास मंडळ व स्पोर्ट्स क्लब उपस्थित होते.