अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय

By नामदेव मोरे | Published: April 2, 2024 05:40 PM2024-04-02T17:40:06+5:302024-04-02T17:41:04+5:30

सावध राहण्याचे अध्यक्षांचे आवाहन.

by using photo in whatsapp dp of annasaheb patil corporation chairman narendra patil fraud gang is active | अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय

अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय

नामदेव मोरे, नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २४ तासांत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या काही व्यक्ती सक्रिय आहेत. त्यामुळे गरजूंची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा ठकसेनांपासून सावध राहण्याचे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे. फसवणूक करणाऱ्यांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना उद्योग उभारण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. गरजूंना बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. कर्जावर महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा देण्यात येतो. महामंडळाच्या सर्व योजना ऑनलाइन आहेत. नागरिकांना सहकार्य करता यावे, यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. जिल्हानिहाय मेळावे घेऊनही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येते. हजारो तरुणांनी या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु, सद्यस्थितीमध्ये महामंडळातून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे.

फसवणूक करणारे दलाल हे अण्णासाहेब पाटील व महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा फोटो फेसबूक व व्हॉट्सॲप डीपी, स्टेटसला ठेवत आहेत. महामंडळातून २४ तासात कर्ज मिळवून दिले जाईल, असे आश्वासन देण्यात येत आहे. प्रोसेसिंगच्या बहाण्याने पैसे मागविले जात आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडल्यास नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. फसवणुकीचे काही प्रकार निदर्शनास आले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. अशा ठकसेनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

महामंडळातून २४ तासात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे तत्काळ कर्ज कोणतीही बँक देत नाही. खोटे आमिष दाखविणाऱ्यांपासून सावध राहावे, अशा व्यक्तींविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्यात येणार आहे - नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

महामंडळाचा ८२,२९० नागरिकांना लाभ -

महामंडळाने आतापर्यंत तब्बल ८२,२९० नागरिकांना उद्योग उभारण्यासाठी बँकांच्या माध्यमातून ६३,७१ कोटी १४ लाख रुपये कर्ज मिळवून दिले आहे. यापैकी ६६,६८१ नागरिकांना व्याज परतावा देण्यात आला आहे. आतापर्यंत ६८१ कोटी रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे.

Web Title: by using photo in whatsapp dp of annasaheb patil corporation chairman narendra patil fraud gang is active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.