नवी मुंबई : माथाडी कामगारांनी पुकारलेला गुरुवारचा बंद मागे घेतला खरा, पण त्याची माहिती वेळेत शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनेक भाज्या, पालेभाज्यांच्या गाड्या बाजार समितीत न पोहोचल्याने मुंबईकरांना शुक्रवारीही भाज्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
कोबी, फ्लॉवर, टाेमॅटो, गवार, दोडका यांच्या खूप कमी गाड्या आल्या. शिवाय आवळा, बीट, घेवडा, कारली, तोंडली यांची आवकच झाली नाही. मेथीची आवक कमी झाली, तर पालक, पुदिना, शेपूसारख्या पालेभाज्या आल्या नाहीत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने फळांची आवक सध्या वाढली आहे.
माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या विधेयकाविरोधात राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी १४ डिसेंबरला एक दिवसाच्या बंदची घोषणा केली होती. बुधवारी, १३ डिसेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर कामगार संघटनांनी बंद मागे घेतला. पण, त्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही. यामुळे गुरुवारी मार्केट सुरू असूनही अवघी ३५ टक्के आवक झाली. फारसे ग्राहकही मार्केटकडे फिरकले नाहीत.
बाजारभाव जैसे थे
पुरेशी आवक नसल्यामुळे कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती.
आवक कमी झाली असली, तरी बाजारभावांवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शुक्रवारी मार्केट सुरळीत सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मार्केटनिहाय दोन दिवसांमधील वाहनांचा तपशील
मार्केट १३ डिसें. १४ डिसें.
भाजीपाला ६७६ १८६
फळ मार्केट ३३४ ७९
धान्य २५२ १४७
कांदा-बटाटा २४८ ४१
मसाला १७८ १४७
कांदा २९ रुपयांवर
बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. बुधवारी १,५६४ टन कांद्याची आवक झाली होती. घाऊक बाजारात त्याला २३ ते ३६ रुपये दर मिळाला होता. गुरुवारी २०० टनच आवक झाली असून, बाजारभाव १९ ते २९ वर आला आहे. शासनाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ही घसरण सुरू आहे.