गांजाच्या अड्ड्यांना पालिकेसह सिडकोचेही अभय

By admin | Published: September 29, 2016 03:33 AM2016-09-29T03:33:14+5:302016-09-29T03:33:14+5:30

पोलिसांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला सिडको व महापालिकेकडून खीळ बसू लागली आहे. वर्षानुवर्षे अमली पदार्थांची विक्री

Cadako abhi | गांजाच्या अड्ड्यांना पालिकेसह सिडकोचेही अभय

गांजाच्या अड्ड्यांना पालिकेसह सिडकोचेही अभय

Next

- नामदेव मोरे, नवी मुंबई

पोलिसांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला सिडको व महापालिकेकडून खीळ बसू लागली आहे. वर्षानुवर्षे अमली पदार्थांची विक्री होत असलेल्या झोपड्यांवर संबंधित प्रशासनाकडून कारवाईच होत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करणारे प्रशासन अवैध व्यवसाय होत असल्याचे उघड होवूनही त्या झोपड्यांवर कारवाई करत नसल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एपीएमसी पोलिसांनी २६ सप्टेंबरला उत्तर प्रदेश कोल्ड स्टोरेजच्या बाजूला असलेल्या झोपडीमधून शांती सुंदरम पिल्लईला अटक केली. तिच्याकडे ६८०ग्रॅम गांजा व रोख रक्कम सापडली. अनेक वर्षांपासून या झोपडीमध्ये शांती व गांजामाफिया अशोक पांडे यांचा अड्डा सुरू आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधील सर्वाधिक गांजा विक्री होणाऱ्या अड्ड्यांमध्ये त्या ठिकाणाचाही समावेश आहे. पांडेवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. अनधिकृत झोपडीमध्ये हा अड्डा सुरू आहे. सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करून पहिली एक झोपडी बांधण्यात आली होती. आता तेथे तीन झोपड्या तयार झाल्या आहेत. गुन्हेगारी कारवायांसाठी वापर होत असलेल्या या झोपड्यांवर पालिका काहीही कारवाई करत नाही. एपीएमसीच्या मसाला मार्केटबाहेर पदपथावर झोपडी बांधून तेथेच गांजाची चार झाडे लावणाऱ्या परप्रांतीयालाही पोलिसांनी अटक केली. परंतु त्या झोपडीवर कारवाई झालेली नाही. धान्य मार्केटच्या बाहेर पणन मंडळाच्या कोल्डस्टोरेजजवळील झोपडपट्टीमध्येही गांजाचा अड्डा सुरू आहे. तेथे आतापर्यंत सहा ते सात जणांना अटक केली आहे. वारली पाडा येथील अनधिकृत झोपडीमध्ये गांजाचा व्यवसाय सुरू असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. याशिवाय नेरूळमध्ये बालाजी टेकडीच्या पायथ्याशीही असणाऱ्या झोपडपट्टीत दोन ठिकाणी गांजा विक्री होते. नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या रोडजवळ अतिक्रमण करून झोपडी उभारली असूनही प्रशासन डोळेझाक करत आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी सीबीडी बेलापूरमधील टाटानगर झोपडपट्टीमध्ये जवळपास एक किलो गांजा जप्त करून एका आरोपीस अटक केली होती. हा अड्डाही अनधिकृत झोपड्यांमध्येच सुरू होता. गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री करणारे माफिया गरीब महिला व परप्रांतीयांना गांजा विक्रीसाठी प्रवृत्त करत आहेत. नेरूळ, इंदिरानगर, बोनसरी, वारलीपाडा, एपीएमसी, सीबीडी व इतर अनेक ठिकाणी झोपडपट्टीमधील अड्ड्यांमुळे परिसरात राहणाऱ्या इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.

‘वॉक वुईथ कमिशनर’मध्ये तक्रार
नेरूळमधील ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे २४ जुलैला ‘वॉक वुईथ कमिशनर’ अभियान होते. तेव्हा बालाजी टेकडीच्या खाली असलेल्या दोन झोपड्यांमध्ये गांजा विक्री होत आहे. तेथे गांजा खरेदीसाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दुल्ल्यांचा वावर असतो. भांडणे होत असल्याने झोपड्यांवर कारवाई करण्याची व गांजा विक्रीचे अड्डे बंद करण्याची लेखी मागणी केली होती. दोन महिने झाल्यानंतरही अद्याप त्या दोन्हीही झोपड्यांवर कारवाई झालेली नाही. बिनधास्तपणे तेथे गांजा विक्री होत आहे.

फक्त पोलिसांची जबाबदारी नाही
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्याची जबाबदारी फक्त पोलिसांचीच नाही. सिडको, महापालिका, एमआयडीसी, एपीएमसी यांनी त्यांच्या जमिनीवर अवैध व्यवसाय होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. नागरिकांनीही कुठे अवैध व्यवसाय होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देवून ते अड्डे बंद करण्यासाठी शक्य ती मदत केली पाहिजे. अमली पदार्थांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होवू नये यासाठी सर्व नवी मुंबईकरांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरच हातोडा
नेरूळमध्ये ज्या ठिकाणी गांजा विक्री होते त्या परिसरात दोन वर्षात चार वेळा कारवाई झाली आहे. येथील गरजेपोटी बांधलेल्या इमारतीही पाडल्या आहेत. परंतु जिथे गांजा विक्री होते त्या झोपडीवर मात्र अद्याप कधीच कारवाई झालेली नाही. भूमिपुत्रांच्या घरांवर हातोडा चालविणारे सिडको व पालिका प्रशासन अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या अनधिकृत झोपड्यांवर का कारवाई करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Cadako abhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.