सानपाडावासीयांचे सिडकोला साकडे
By admin | Published: June 25, 2017 04:16 AM2017-06-25T04:16:29+5:302017-06-25T04:16:29+5:30
सानपाडा सेक्टर-३0मध्ये उद्यान आणि विरंगुळा केंद्राचा अभाव आहे. खेळासाठी मोकळी मैदाने आरक्षित केलेली नाहीत. वापराविना पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर-३0मध्ये उद्यान आणि विरंगुळा केंद्राचा अभाव आहे. खेळासाठी मोकळी मैदाने आरक्षित केलेली नाहीत. वापराविना पडून असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. तर काही ठिकाणी डेब्रिजचे ढीग पडले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सानपाडा सेक्टर-३0मध्ये जवळपास पाच हजारांची लोकवस्ती आहे. ही संपूर्ण वसाहत सायन-पनवेल महामार्गाला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच ध्वनिप्रदूषणाचा त्रास जाणवतो. विशेष म्हणजे, वसाहत निर्माण करताना या परिसरात खेळाचे मैदान, उद्यान व विरंगुळा केंद्राचे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठी अडचण होत आहे. सानपाडा रेल्वे स्थानकाच्या शेजारी रेल्वेमार्गालगत एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा मोकळा भूखंड आहे. गेली अनेक वर्षे हा भूखंड वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज पडले आहे. तसेच समोरच असलेल्या एका हॉटेलचालकाने या भूखंडाला तारेचे कुंपण लावून त्याचा वापर सुरू केला आहे.
या भूखंडावर एखादे विरंगुळा केंद्र किंवा उद्यान विकसित करावे, अशी मागणी सेक्टर-३0 येथील शिवशंभो रहिवासी व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने केली जात आहे. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर गुरुवारी स्थानिक नगरसेविका फशीबाई करसन भगत यांच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी सिडकोवर धडक मारली. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत व असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या परिसरात एकही विरंगुळा केंद्र आणि उद्यान नसेल, तर ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने नक्कीच सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन चव्हाण यांनी या वेळी शिष्टमंडळाला दिले.