आरोपीच्या अटकेसाठी पिंजले शेत; तुर्भे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:47 AM2020-10-08T00:47:34+5:302020-10-08T00:47:40+5:30
अत्याचार करून काढला होता पळ
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळालेल्या व्यक्तीला पोलिसांनी दोन दिवसांत मंगळवारी शिताफीने अटक केली आहे. त्याच्या अटकेसाठी उस्मानाबाद येथील होळी गावातली उसाची शेते पिंजून काढावी लागली. अत्याचार केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावून तो गावी पळाला होता.
विजय राठोड असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो तुर्भे एमआयडीसी परिसरात राहणारा असून, मूळचा उस्मानाबादचा आहे. रविवारी दुपारी त्याने तुर्भे स्टोअर परिसरातल्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. ही मुलगी त्याच्या घरासमोरून जात असताना, त्याने मुलीला ओढत घरात नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केले, शिवाय पोलिसांकडे तक्रार न करण्याची धमकी तिच्या कुटुंबीयांना दिली होती. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत, गुन्हा दाखल झाला होता. राठोडने कारवाईच्या भीतीने शहरातून पळ काढला होता. यामुळे त्याच्या अटकेसाठी परिमंडळ एकचे उपायुक्त सुरेश मेंगडे व सहायक आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सचिन राणे यांनी सहायक निरीक्षक दीपक डोंब, पवन नांद्रे, उपनिरीक्षक अर्चना गाढवे, हवालदार शत्रुघ्न मावळे, दिनेश मोरे, सुमित सरगर यांचे पथक तयार केले होते. या दरम्यान, राठोड सानपाडा येथून खासगी बसने पुण्याच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानुसार, तपास पथकाने माहिती काढली असता, तो उस्मानाबादला गेल्याचे समोर आले. यामुळे त्याच्या अटकेसाठी हवालदार दिनेश मोरे, रवी पवार व विकास शिंगाडे हे उस्मानाबादला रवाना झाले, परंतु तिथेही तो ठिकाणे बदलत होता.
पोलिसांची कारवाई
अखेर मंगळवारी तो होळी गाव येथे असल्याची माहिती मिळाली असता, पथक त्या ठिकाणी गेले असता, राठोड उसाच्या शेतात लपला होता. यावेळी त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी परिसरातली सगळी उसाची शेते पिंजून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.