कॉलसेंटरचा भांडाफोड; आंतराष्ट्रीय कॉलला दिसायचा भारतीय नंबर, "कॉल राऊंटिंग" करून मिळवायचे नफा
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 25, 2022 07:38 PM2022-10-25T19:38:04+5:302022-10-25T19:38:37+5:30
देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातले नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशनला मिळाल्या होत्या.
नवी मुंबई : वेगवेगळ्या देशातून भारतात येणाऱ्या कॉलचे बेकायदेशीर राऊंटिंग करणाऱ्या कॉल सेंटरचा गुन्हे शाखा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. दूरसंचार विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून शासनाचा महसूल बुडवून हे कॉलसेंटर चालवले जात होते. त्याची माहिती मिळताच दोन महिन्याच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी हे रॅकेट उघड करून चौघांना अटक केली आहे.
देशातील काही व्यक्तींना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांनी कॉल केल्यास मोबाईलवर भारतातले नंबर दिसत असल्याच्या काही तक्रारी डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशनला मिळाल्या होत्या. त्यांच्याकडून वापरले जाणारे सर्व्हर नवी मुंबई परिसरात असल्याने डॉटने याबाबत नवी मुंबई गुन्हे शाखेला कळवले होते. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे व कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तयार केले होते. त्यांच्याकडून चाललेल्या सुमारे दोन महिन्यांच्या तपासानंतर चौघांना अटक करून त्यांच्यामार्फत चालणारे बेकायदेशीर कॉलसेंटर उघडकीस आणले आहे.
सूरज वर्मा, अनुप वर्मा, साजिद सय्यद व अब्दुल फिरोजाबादी अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांचे इतर साथीदार व मुख्य सूत्रधार याचा शोध सुरु असल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दूरसंचार विभागाच्या नियमावलीनुसार वेगवेगळ्या देशातून नेटवर्क कंपन्यांमार्फत भारतात थेट कॉल येत असतात. त्याची नोंद होत असते शिवाय त्यामार्फत शासनाला देखील महसूल मिळत असतो. परंतु अटक केलेल्या चौघांची त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ग्लोबल इंटरप्राइजेस नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी विदेशातल्या काही कंपन्यांसोबत व्यवहार ठरवून भारतात येणारे कॉल थेट न जाऊ देता त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाठवले जात होते. यासाठी ग्लोबल इंटरप्रायजेसने एका नेटवर्क कंपनीचे सुमारे बाराशे नंबर घेतले होते. त्याद्वारे विदेशातून भारतीयांना येणारे कॉल इंटरनेटच्या माध्यमातून बाराशे पैकी कोणत्याही नंबरवरून पुढे पाठवला जायचा. त्यामुळे भारतीयांना त्यांच्या मोबाईलवर आंतराष्ट्रीय कॉल येऊन देखील नंबर मात्र भारतातीलच दिसत होता.
या प्रक्रियेचा वापर गुन्हेगारी कृत्यासाठी देखील झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मंदिरावर हल्ल्यासाठी आलेला कॉल देखील याच कंपनी मार्फत आल्याचेही समोर आले आहे. परंतु कोणत्याही प्रकारचे कार्यालय न टाकता, केवळ इंटरनेटच्या माध्यमातून हा प्रकार चालत असल्याने हे रॅकेट उघड होऊ शकले नव्हते. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून गुन्हेगारांचा शोध घेऊन हे रॅकेट उघड केले आहे. त्यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मागील काही महिन्यात शासनाचा तीन कोटीहून अधिक महसूल बुडवला आहे.