मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:05 AM2018-07-25T03:05:57+5:302018-07-25T03:06:13+5:30

बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.

Call for the Navi Mumbai Bandi today for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई बंदची हाक

Next

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समन्वय समितीचे पदाधिकारी व माथाडी नेते यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलने होत आहेत. अशातच सोमवारी औरंगाबाद येथे मोर्चादरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तर मंगळवारी राज्याच्या अनेक भागात बंद पुकारल्यानंतर बुधवारी मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी एपीएमसी येथे मराठा समन्वय समितीसह माथाडी नेते, कामगार यांच्यात बैठक झाली. त्यास आमदार नरेंद्र पाटील, प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, मराठा समन्वय समितीचे अंकुश कदम, मोहन पाडळे, सूरज बर्गे, नीलेश मोरवे, विजय खोपडे, जितेंद्र येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत बुधवार, २५ जुलै रोजी नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय सर्वमताने घेण्यात आला. हा बंद मराठा आरक्षणाच्या मागणीसह मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी केला जाणार असल्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर बैठकीदरम्यान कै. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात आले. मात्र, बंदमधून शाळा, महाविद्यालये यासह भाजी मार्केट व रुग्णालये अशा अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी सरकार गांभीर्याने घेत नसल्याने राज्यभर आंदोलने होत आहेत. त्यानंतरही केवळ आरक्षणाचे पोकळ आश्वासन देऊन समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत आहे. यामुळे जनतेमध्ये सरकारविषयी तेढ निर्माण झालेली असून, आरक्षणाच्या मागणीकरिता निघणाऱ्या आंदोलनामधून ती उमटत आहे. परंतु नवी मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानुसार पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. शहरातील महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानके, बस डेपो याठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त लावला जाणार आहे.

Web Title: Call for the Navi Mumbai Bandi today for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.