कळंबोली : पनवेल तालुक्यातील सहा आदिवासी वाड्या पनवेल तालुका पोलिसांनी दत्तक घेतल्या आहेत. त्यानुसार याठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार कोंबल टेकडी येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांत वाडीवरील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे आधार कार्ड काढण्यात आले. तसेच शिधापत्रिकांसह इतर योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.पनवेल तालुक्यातील कोंबल टेकडी, खैरातवाडी, फणसवाडी, ठाकूरवाडी, पालेवाडी, डांगरेश्वर वाडी या आदिवासी वाड्या अतिशय दुर्गम भागात आहेत. पनवेल परिसराचा विकास झाला असला तरी येथे पायाभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आदिवासी विकास विभागाच्या अनेक योजना अस्तित्वात आहेत. मात्र, त्या या वाड्यांवर पोहोचत नाही. शासकीय लाभापासून कित्येक कुटुंबे वंचितच राहतात. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या आदेशानुसार, तालुका पोलिसांनी या वाड्या दत्तक घेतल्या आहेत. सुरुवातीला याठिकाणी सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यात आले. आॅक्टोबरमध्ये कोंबल टेकडी येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर पाणी व विजेची सोय करून देण्यात आली. रविवारपासून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आधार कार्ड शिबिराचे आयोजन वाडीवर करण्यात आले आहे. सुमारे शंभरहून अधिक ग्रामस्थांनी आधार कार्ड काढले. याशिवाय शिधापत्रिका, राजीव गांधी जीवनदायी योजना, संजीव गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक पेन्शन यासारख्या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता अर्ज भरून घेण्यात येणार आहे. बुधवारी तहसीलदार दीपक आकडे, मालोजी शिंदे हे आदिवासी बांधवांबरोबर थेट संवाद साधणार आहेत. (वार्ताहर)
आदिवासी वाड्यांमध्ये आधार कार्डसाठी शिबिर
By admin | Published: November 16, 2016 4:48 AM