नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अपात्र ठरलेल्या २१९ बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.सिडको, महापालिका आणि एमआयडीसी या तिन्ही प्राधिकरणांनी परस्पर समन्वयाने अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रत प्राप्त न झाल्याने या तिन्ही प्राधिकरणांनी कारवाईबाबत काहीसा सावध पावित्रा घेतला होता. मात्र दोन दिवसांपासून न्यायालयाच्या निर्णयाची ४0 पानांची प्रत संबंधितांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुढील काळात अतिक्रमण विरोधी कारवाई गतिमान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सिडकोने उरण, पनवेलसह नवी मुंबई विभागातील २१९ अतिक्रमणांची यादी तयार करून त्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. तर एमआयडीसीनेही आपल्या क्षेत्रातील १८00 बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेने मात्र यासंदर्भात म्हणावी तशी कार्यवाही सुरू केली नव्हती. परंतु आता महापालिकेलासुध्दा अतिक्रमणांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणे भाग असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, जाहीर केलेल्या यादीतील अतिक्रमणांवर सोमवारपासून धडक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश म्हसे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अतिक्रमण विरोधात मोहीम तीव्र
By admin | Published: August 26, 2015 10:36 PM