नवी मुंबई : महापालिकेने शहरात तीन ठिकाणी धडक कारवाई केली. घणसोलीमध्ये एका इमारतीवर हातोडा चालविण्यात आला. तुर्भेमध्ये शीतगृहाचे अनधिकृत शेड व बेलापूरमध्ये धार्मिक स्थळाच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. बेलापूर विभागांतर्गत भूखंड क्र . सी १२ सेक्टर २३ दारावे येथील ड्रीम हाउस सोसायटीच्या पार्किंग एरियामध्ये अनधिकृत मदरसा सुरू होता. या मदरशाच्या अनधिकृत बांधकामास बेलापूर विभाग कार्यालयामार्फत एम.आर.टी.पी. कायदा १९६६ मधील कलम ५३(१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही अनधिकृत बांधकाम काढून घेतले नसल्याने बेलापूर विभागामार्फत जोरदार कारवाई करत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एक ट्रक, २० मजुरांसह बेलापूर विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात होते. तुर्भे विभागातील सेक्टर १८ मॅफ्को मार्केट येथील हिमाचल कोल्ड स्टोरेज यांनी अनधिकृत दोन प्लॅस्टिक शेड उभारलेले होते. यावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन जे.सी.बी., एक ट्रक, २५ मजुरांसह तुर्भे विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच अतिक्र मण विभागाचे पोलीस पथक, कर्मचारी या मोहिमेमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात होते. यापुढील काळातही सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात या मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
घणसोली गावातील दत्तनगर येथील कृष्णाजी कल्याणकर आणि अशोक ढवळे यांच्या नव्याने बांधण्यात येत असलेले आरसीसी कॉलम निष्काषित करण्यात आले. गुणाले तलावाजवळील ताराईनगर येथील भागोजी चिकणे आणि भगवान नवघने यांनी इमारतीचे दुसऱ्या मजल्याचे वाढीव बांधकाम केले होते. त्या बांधकामावर कारवाई करण्यात आली.